माजी आ. भालेराव गोरगरिबांच्या मदतीसाठी गावोगावी पोहोचले
वडिलांच्या कार्यात मुलांचाही सहभाग : नागरिकाना अन्नधान्याचे कीट घरपोच
उदगीर : राजकारणात राहूनही समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कोरोनाच्या संकटात मतदारसंघातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी गावोगावी पोहोचले असून खऱ्या गरजू गरीब जनतेला अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात येत आहेत.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात त्यांची गावोगावी जनतेशी नाळ जुळलेली आहे. गावोगावी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ही जनतेशी जुळलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. नेहमीच ते सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतात.
सध्या कोरोनाच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. दोन वेळच्या लॉकडाऊन मूळे गोरगरीब जनतेची उपासमार होत आहे. आणखी तिसऱ्यांदा लोकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे या गोरगरीबाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या परिस्थितीत त्यांना माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात द्यावा ही भावना बाळगून माजी आ. सुधाकर भालेराव यांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन या जनतेला अन्न धान्याचे किट देण्याचे नियोजन केले. जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गरजू लोकांची यादी तयार करून त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचे किट घरपोच देण्याची योजना आखून ती राबविली. जवळपास एक हजारांच्यावर अन्नधान्याचे किट तयार करून ते गरजू पर्यंत पोहोचविली जात आहेत. माजी आ. भालेराव यांच्या या समाजकार्यात त्यांचे पुत्र अमोल भालेराव, मुलगी ऐश्वर्या भालेराव हे देखील हिरीरीने सहभागी होऊन गरजू लोकांना मदतीसाठी पुढे आले आहेत.
आज सोमवारी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, माजी आ. सुधाकर भालेराव, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांच्या उपस्थितीत हे अन्नधान्याचे किट असलेले टेम्पो जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागाकडे रवाना करण्यात आले. माजी आ. सुधाकर भालेराव यांचे सुपुत्र अमोल भालेराव, मुलगी ऐश्वर्या भालेराव हे स्वतः गावोगावी जाऊन गरजू लोकांना अन्नधान्याचे किट घरपोच देत आहेत.
यावेळी बोलताना माजी आ. भालेराव यांनी या कोरोनाच्या संकटात सामान्य जनतेच्या मदतीला माणुसकीच्या भावनेतून धावून जाणे गरजेचे आहे. या काळात प्रशासन जनतेच्या आरोग्यासाठी झटत असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कोरोनामुळे मोठया प्रमाणात गरीब जनतेला संकटाला सामोरे जावे लागत असून अशा काळात समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनानी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी भालेराव यांनी केले आहे.