उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी
• विधानसभा मतदारसंघ निहाय वेळापत्रक जाहीर
• उदगीर मतदारसंघातील पहिली तपासणी ७ नोव्हेंबरला
लातूर, दि.०५ : विधानसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाच्या नोंदवहीची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून निवडणूक काळात तीन वेळा केली जाणार आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ही तपासणी नेमून दिलेल्या दिवशी सकाळी १० वाजता होईल. तरी खर्च तपासणीसाठी उमेदवार, प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार दिलेल्या दिवशी, ठिकाणी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर जिल्हा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी राजेंद्र नागणे यांनी केले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता उदगीर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे.अहमदपूर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची पहिली खर्च तपासणी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. तसेच लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी ९ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.
दुसरी तपासणी १२ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार असून या दिवशी लातूर ग्रामीण आणि लातूर शहर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी होईल. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी होणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२४ रोजी लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी होईल. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी होईल.
या वेळापत्रकानुसार दिलेल्या दिनांकास उमेदवारांनी स्वत: किंवा त्यांचे प्राधिकृत निवडणूक प्रतिनिधी यांनी खर्चाची नोंदवही, प्रमाणके, निवडणुकीसाठीच्या खर्चाचे बँक पासबुकसह व इतर आवश्यक सर्व अभिलेख्यासह सकाळी १० वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच खर्चाच्या नोंदवह्यांच्या तपासणी दरम्यान जनतेचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात आणि प्रत्येक पृष्ठासह 1 रूपया इतकी रक्कम प्रदान केल्यावर कोणतीही व्यती कोणत्याही उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून घेऊ शकतात, असेही श्री. नागणे यांनी कळविले आहे.
*****
addComments
टिप्पणी पोस्ट करा