उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना

उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना
उदगीर: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे वाहतुकीची कुठलीच सोय नसल्याने उदगीरात अडकून पडलेल्या काही विद्यार्थी व मजुरांना घेऊन परिवहन मंडळाची बस नागपूरकडे आज रवाना करण्यात आली. तब्बल ५१ दिवसानंतर आज बस रस्त्यावरून धावत आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे देशातील सर्व वाहतूक यंत्रणा ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा फटका शहरात बाहेरून आलेल्या मजूर व विद्यार्थी वर्गांना बसला. गेली दोन महिन्यांपासून आपल्या गावाकडे जाण्यासाठी हे मजूर व विद्यार्थी प्रयत्न करीत होते. मात्र कुठलीच सोय नसल्याने यांना उदगीर शहरातच अडकून राहावे लागले. यात विद्यार्थी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील असल्याने त्याच कँपस मध्ये त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली. तर मजुराना पालिकेने बांधलेल्या रात्र निवारा केंद्राचा आधार मिळाला.
परवा राज्य शासनाने अशा बाहेरगावी अडकलेल्या मजूर व विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार असल्याचे आदेश काढले. यानंतर सदरील विद्यार्थी व मजुरांनी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधला. सामाजिक अंतराचा नियम बाळगत एका आसनावर एक प्रवाशी असे एकूण 24 प्रवाशी संख्या पूर्ण झाल्यानंतर ही बस नागपूर कडे रवाना करण्यात आली. यात 13 विद्यार्थी व 11 मजुरांचा समावेश आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, आगार प्रमुख यशवंत काणतोडे यांच्या उपस्थितीत ही बस नागपूर कडे रवाना झाली.
दरम्यान उदगीरच्या बसस्थानकात अशा प्रवाशांसाठी नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून एका बसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांशी संपर्क साधून बस संबंधित गावाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुरेश कज्जेवाड यांनी दिली.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image