मिशन बिगिन अगेनः महाराष्ट्रात ३ ते ८ जूनदरम्यान तीन टप्प्यांत उठणार लॉकडाऊनचे निर्बंध!
मुंबईः केंद्र सरकारने जारी केलेल्या पाचव्या टप्प्याच्या अधिसूचनेनंतर महाराष्ट्र सरकारनेही आज नव्याने लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रातही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहाणार असून महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ हे नवीन धोरण अवलंबले आहे. त्यानुसार ३, ५ आणि ८ जून दरम्यानच्या तीन टप्प्यांत अनेक गोष्टी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता कंटेनमेंट झोन वगळता सरकारी कार्यालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल, मॉल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही.
पहिला टप्पाः ३ जूनः
१. बीच, सरकारी-खासगी मैदाने, सोसायट्यांचे मैदानं, गार्डन अशा ठिकाणी व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. त्यासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळातच हे करता येईल. समूहाने कोणतीच कृती करता येणार आहे. लहान मुलासोबल एका मोठ्या व्यक्तीला राहता येईल. जवळच्या ठिकाणी व्यायाम करावा, लांबची आणि गर्दीची ठिकाणे टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
२. प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना मास्क, सॅनिटायझरचा अनिवार्य वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरूवात करता येईल.
३. गॅरेजेस सुरू करता येतील. पण गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल.
४. अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल.
दुसरा टप्पाः ५ जूनः
१. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी असेल. यासाठी पी-१ आणि पी-२ असा नियम असेल. म्हणजेच रस्त्याच्या/लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. ही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच काळात सुरू ठेवता येतील.
अटीः
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल. दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची जबाबदारी दुकानमालकावर असेल.
लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा. असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. त्यासाठी वाहनही वापरता येणार नाही.
एखाद्या मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा पाळल जात नसल्याचे आढळल्यास ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.
२.टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही परवानगी असेल. १ चालक आणि दोन प्रवाशांनाच परवानगी असेल. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.
तिसरा टप्पाः ८ जूनः
खासगी कार्यालयांना कामकाज सुरू करण्यास परवानगी. मात्र केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी संसर्ग पसरू नये म्हणून सॅनिटायझेशनसह सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा