स्त्रियांना आत्मनिर्भरतेची जाणीव करून देणारा तरुंगवाडा: लक्ष्मीकमल गेडाम

स्त्रियांना आत्मनिर्भरतेची जाणीव करून देणारा तरुंगवाडा: लक्ष्मीकमल गेडाम


उदगीर: ग्रामीण भागातील रितीरिवाज, वेगवेगळ्या परंपरा , शिक्षणाचा अभाव यातून होणारे संस्कार आणि स्त्रियांवर लदली गेलेली बंधने त्याचबरोबर त्यांच्या मध्ये असलेली अंधश्रद्धा यामुळे स्त्रियांच्या मनात निर्माण होणारे भयगंड आशा परिस्थितीत देखील स्त्रीयांना खंबीर बनवून त्यांच्यातील आत्मनिर्भरतेची जाणीव करुन देणारी कादंबरी म्हणजे तुरुंगवाडा होय असे मत प्रसिद्ध साहित्यिका श्रीमती लक्ष्मीकमल गेडाम यांनी व्यक्त केले .


चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत पार पडलेल्या २२२ व्या वाचक संवादात श्रीमती लक्ष्मीकमल गेडाम यांनी स्वलिखित तुरुंगवाडा या कादंबरीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी स्त्रीयांवर होणारे अन्याय अत्याचार यावर तुरुंगवाडा या कादंबरीत टाकलेला प्रकाश आणि स्त्रीयांना आपले जीवन सफल बनविण्यासाठी धाडसी बनून परिस्थितीशी तडजोड करत अन्यायाविरूध्द बंड पुकारण्याचे स्फुरन दिले. चार पिढ्याचा इतिहास आणि त्यातील अनेक प्रसंग आणि प्रश्न यामाध्यमातुन मांडले . प्रसंग वाचनासह साधलेला हा संवाद अत्यंत प्रभावी ठरला.


दिल्ली येथुन मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधलेला हा कार्यक्रम फेसबुक आणि युट्युब लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला. या संवादानंतर झालेल्या चर्चेत मुरलीधर जाधव यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. या संवादाचे सुत्रसंचलन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार हावगीस्वामी महा विद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगदाळ यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी बालाजी सुवर्णकार यांनी पुढाकार घेतला .