उदगीरात कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शने

उदगीरात कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शने


 


उदगीर (ता.प्र.) केंद्र सरकारने कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य(प्रोत्साहन व सुविधा) आणि शेतकरी(सक्षमीकरण व संरक्षण) किंमत हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके संसदेत पारित करून घेतलेली आहेत. ही कृषी विधेयके शेतकरी विरोधी असून 'कायदा नको, स्वामीनाथन आयोग हवा' अश्या आशयाचे फलक हातात घेवून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर केंद्र सरकार व विधेयकाच्या विरोधात लोकभारती पक्ष व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.


केंद्र सरकारने आणलेल्या या दोन्ही विधेयकाविरुद्ध शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिवसापासून हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. हे आंदोलन महात्मा गांधी जयंती पर्यंत सुरू राहणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी लोकभारती पक्षाचे अजित शिंदे, माजी नगरसेवक अहमद सरवर, सोनू पिंपरे, विजय बामणीकर, बाजार समितीचे सचिव एन. डी. हंगरगे, कर्मचारी प्रदीप पाटील, दगडू माने, दिनकर कांबळे, सतीश पाटील मानकीकर, हबीब दुराणी, भगवान मांजरे सह शेतकरी, हमाल व मापारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.