*शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
दि.12 जानेवारी 2021
उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांची 422 व स्वामी विवेकानंदाची 158 वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामानवांना विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, बाल शिवाजीच्या मनात स्वराज्याची भावना निर्माण करून त्यांना खंबीर राष्ट्रवादाचे धडे दिले.यवनांनी मुघल आणि बहामनी काळापासून जनतेवर अन्याय अत्याचार कसे केले ,स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगून बहुजन समाजाला गुलाम केल्याचा इतिहास त्यांच्या पुढे ठेवला.त्यातूनच बालशिवाजीचे संस्कार संपन्न मन घडत गेले. अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी निर्माण होत गेली.म्हणूनच त्यांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे कल्याणकारी राज्य उभे केले.याचे सर्व श्रेय जिजाऊ माॅसाहेब यांच्याकडे जाते म्हणून त्या आदर्श माता व उत्तम प्रशासक ठरतात.यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना असे म्हटले की, युवकांनी त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन आदर्श बलसंपन्न भारताचे स्वप्न साकार करावे.पुढे बोलताना ते म्हणाले की,राष्ट्र आणि धर्म यांचा उन्माद द्वेष व त्यातून येणारी असहिष्णुता माणसाला पशू बनवते व ती मानवी संस्कृतीच्या विनाशाला कारणीभूत होते.म्हणून त्यांनी धर्म पंथ जात लिंग आणि राष्ट्रीयत्व या गोष्टींना नाकारून विश्व बंधुभावाची संकल्पना मांडली. यातच त्यांच्या कार्याचे मर्म अनुस्यूत झाल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंतीचे समिती प्रमुख डॉ.सूर्यकांत सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.सुरेश शिंदे यांनी मानले. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्ही.डी.गायकवाड,स्टाफ सेक्रेटरी डॉ.व्ही.के.भालेराव तसेच प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा