अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही लातूरकरांसाठी पर्वणी - राज्यमंत्री संजय बनसोडे

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही लातूरकरांसाठी पर्वणी - राज्यमंत्री संजय बनसोडे


 


  लातूर/प्रतिनिधी:साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात पुण्यानंतर आता लातूरची ओळख आहे. उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्हा वासियांसाठी पर्वणी ठरणार आहे,असे मत राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

  उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त येथील पूर्णानंद मंगल कार्यालयात आयोजित साहित्यिकांच्या बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते.व्यासपीठावर संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर,मसापच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शेषेराव मोहिते,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सूर्यनारायण रणसुभे,उद्योजक रमेश अंबरखाने,पत्रकार जयप्रकाश दगडे,दिनेश सास्तुरकर,अशोक गोविंदपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, साहित्य संमेलन उदगीर येथे होत असले तरी ते संपूर्ण जिल्ह्याचे आहे.जिल्ह्यातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ पूर्वीपासूनच गतिमान आहे.त्यामुळे या क्षेत्रात लातूरचा दबदबा आहे. नागरिकांना साहित्यिक मेजवानी मिळावी,

विद्यार्थ्यांची बौद्धिक उंची वाढावी यासाठी संमेलन उपयुक्त ठरणार आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.कसलीही उणीव राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या जिल्ह्यात हे संमेलन होणार आहे.संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखावी,असेही बनसोडे म्हणाले.

   संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी सांगितले की,उदगीर येथे होणारे साहित्य संमेलन लातूरकरांचे व संपूर्ण मराठवाड्याचे आहे.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीद्वारे संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित या संमेलनातून तरुण पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वाचन संस्कृती वाढली तर सुसंस्कृत माणसे तयार होतील.संमेलनाच्या आयोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सीमा भागातील मराठी भाषिक शाळा आणि विद्यार्थ्यांना संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सीमाभागातील कवींसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित होणारे परिसंवाद,कथाकथन यासह पर्यावरणावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

आजवरच्या ९४ साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांचा छायाचित्रासह परिचय करून देणारे विशेष दालन संमेलनात असणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना पुढील वर्षी असणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ यानिमित्ताने केला जाणार आहे.राज्यातील ३०० प्रकाशक संमेलनस्थळी स्टॉल उभारणार आहेत.पालकांनी पाल्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे पुस्तकांची खरेदी करू द्यावी,असे नागराळकर म्हणाले.

   संमेलनासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.राज्यातील चित्रकार व व्यंगचित्रकारही निमंत्रित आहेत.साहित्य संमेलन हा जगन्नाथाचा रथ आहे. तो ओढण्यासाठी सर्वांनीच हातभार लावावा,असेही ते म्हणाले.

  ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते यांनी ज्या पद्धतीने उदगीरच्या साहित्य संमेलनासाठी वातावरण निर्मिती होत आहे तशी इतरत्र कुठेही झाली नसल्याचे मत व्यक्त केले.डॉ.रणसुभे यांनी साहित्य संमेलनानंतर उर्वरित रकमेतून मराठवाड्यातील लेखक व लेखिकांना पुरस्कार दिले जावेत,अशी सूचना केली.जयप्रकाश दगडे यांनी संमेलनातील मंडपाच्या प्रत्येक खांबावर छायाचित्रासह कवितेच्या चार ओळी लिहिलेले फलक लावावेत,असे सूचित केले.

   रामचंद्र तिरुके यांनी प्रास्ताविकात उदगीर येथे होणारे संमेलन अखिल भारतीय नव्हे तर विश्वस्तरीय व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.स्व.विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात साहित्य संमेलनाचे बीज रोवले गेले. त्याचा आता वटवृक्ष होऊन उदगीर येथे प्रत्यक्षात संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.तीन राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या उदगीर तालुक्यात बहुभाषिक नागरिक राहतात.उदगीर ही क्रांतिकारकांची भूमी आहे. पेशवे आणि निजाम यांच्यात  येथे घनघोर युद्ध झाले होते. याच मातीत असणारे उदयगिरी महाविद्यालय संमेलनाचे आयोजक आहे.या महाविद्यालयाने आजवर ३ लाख विद्यार्थी घडवले असून ते विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.यजमान म्हणून साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी काम करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

    यावेळी दयानंद बिराजदार,नागेश पाटील, डॉ.सतीश यादव,राजेंद्र माळी, भारत सातपुते,योगीराज माने,सविता धर्माधिकारी, दर्शना देशमुख,सुनिता आरळीकर,अशोक गोविंदपूरकर,रमेश चिल्ले, प्रकाश घादगिने,जयद्रथ जाधव यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी सूचना मांडल्या.

  प्रारंभी स्व.लता मंगेशकर व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्वांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी तर शैलजा कारंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

   या बैठकीस धनंजय गुडसुरकर, रसूल पठाण, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, विवेक होळसंबरे, नरसिंग इंगळे, लहू वाघमारे,जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,यांच्यासह शहर व  जिल्ह्यातील साहित्यिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.