*महाराष्ट्र महाविद्यालयात रंगली काव्यवाचन स्पर्धा*

 *महाराष्ट्र महाविद्यालयात रंगली काव्यवाचन स्पर्धा*निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक, कौटुंबिक कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. कु. बेलकुंदे सुषमा या विद्यार्थिनीने ॱगुरुत्वॱ व ॱआईॱया कविता सादर करून, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईचे योगदान काय असते याची जाणीव करून दिली. कु. टप्पेवाले सुमैय्या हिने ॱमाई सिंधुताई सपकाळॱ ॱजिंदगीॱ या कविता सादर करून अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन व कार्याचा गौरव केला. कु. जगताप सुलक्षणा यांनी माणसांच्या आयुष्याचं कोडं कधी सुटत नाही ते सोडवण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात हे आपल्या ॱआयुष्याचं कोडंॱ या कवितेतून मांडले. कु. पांचाळ सपना यांनीही आपल्या आयुष्यात आई-बाबा या दोन व्यक्तींचे महत्त्व किती आहे हे गेय स्वरुपात सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर कु. प्राजक्ता पांचाळ यांनी काव्य निर्मिती कशी होते यावर भाष्य करून ॱमुलगीॱ कुटुंबात किती महत्त्वाची आहे याची जाणीव आपल्या कवितेतून करून दिली.
या बहारदार काव्य संमेलनाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रमाकांत घाडगे यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कोलपुके हे होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम
,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांचीही उपस्थिती यावेळी होती.
प्रास्ताविक डॉ. हंसराज भोसले यांनी केले, या बहारदार काव्यस्पर्धेचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले. आभार डॉ.ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले.