प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर
माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
उदगीर: शहरातील महात्मा फुले नगर,संजय नगर, वडार सोसायटी, फुले नगर, संग्राम सोसायटी, बांगबंदी परिसर गांधी नगर या भागात पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या नागरिकांना त्यांच्या घराचे कबाले देण्यात यावे या मागणीसाठी दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले. दिलेले आश्वासन प्रशासनाने नाही पाळले तर पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.
उदगीर शहरात नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या महात्मा फुले नगर,संजय नगर, वडार सोसायटी, फुले नगर, संग्राम सोसायटी, बांगबंदी परिसर गांधी नगर या भागातील नागरिक अनेक पिढ्यापासून राहत आलेले आहेत. मात्र आजही त्यांच्याकडे राहत्या जागेचे कबाले दिले गेले नाही. ते कबाले देण्यात यावे ही अनेक वर्षांपासून ची मागणी आहे. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांनी नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला प्रभागातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, उत्तरा कलबुर्गे, बापूराव यलमटे, सरोजा वारकरे, आनंद बुंदे, रुपेंद्र चव्हाण, अमोल अनकल्ले, अमर सूर्यवंशी, जवाहर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला होता.
काल उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासनाला सोबत घेऊन उपोषण स्थळाला भेट दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे उपस्थित होते.
यावेळी ना. बनसोडे यांनी रामेश्वर पवार यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. मात्र योग्य प्रशासनाने योग्य आश्वासन दिल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका माजी नगरसेवक पवार यांनी घेतली. पवार यांच्या भूमिकेला प्रतिसाद देत मंत्री बनसोडे यांनी प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यावरून एक तारखेपासून सदरील भागाचे सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रामेश्वर पवार यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र दिलेले आश्वासन पाळले गेले नाही तर आपण पुन्हा उपोषण करू असा इशारा पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन पवार यांनी आपले उपोषण सोडले.
यावेळी तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा