प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रम
यशस्वीतेसाठी सर्वांनी परस्परांत समन्वय ठेवावा
-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
दिव्यांगांना साहित्य वाटपाचा संभाव्य कार्यक्रम जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार: जिल्ह्यातील 8 हजार 797 दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप होणार
लातूर, :- केंद्र शासन व अलिमको या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील 8 हजार 797 दिव्यांगाना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल(आभासी) पद्धतीने साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाज कल्याण विभाग, महापालिका, सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी परस्परांत योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, लातूर महापालिकेचे उपायुक्त हर्षल गायकवाड, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्री. साळुंके, सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी तसेच दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेचे प्रमुख सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील दिव्यांगाना कृत्रिम साहित्य वाटप करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात येणार होते परंतु कोरोनाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने करण्याचे निश्चित झाले असून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असून सर्व संबंधित विभागांनी दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व आपल्या तालुक्यातील सर्व दिव्यांगाना तालुका मुख्यालय घेऊन येणे व साहित्य वाटप झाल्यानंतर त्यांना कोणत्याही अडचणी शिवाय त्यांच्या घरी पोहोच करणे हे तालुका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक 100 दिव्यांग व्यक्तीसाठी नोडल अधिकार्यांची नियुक्ती करावी. त्यासाठी समाज न्याय विभागाच्या शिक्षकांच्या तसेच विस्ताराधिकारी यांच्या ऑर्डर काढाव्यात. दिव्यांग व्यक्तींचा व्हाट्सअप ग्रुप तयार करावा व त्यांना वेळोवेळी अद्यावत माहिती देण्यात यावी. तसेच दिव्यांगासाठी काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाजिक संस्थांचा संघटनांचा सहभागी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घेण्यात यावा असे आव्हान जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
जिल्हा मुख्यालयाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात येणार असून प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योग्य जागांची निवड करावी व त्याठिकाणी दिव्यांगासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. त्याच प्रमाणे या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा प्रशासनाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवावे व हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
प्रारंभी समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जुलैच्या पहिल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यातील दिव्यांगाना वर्च्युअल पद्धतीने कृत्रिम साहित्य वाटप कार्यक्रमाची संभाव्यता आहे असे सांगितले. जिल्ह्यात मागील काळात समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांगाचे तालुकानिहाय शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरामध्ये जवळपास 11 हजार दिव्यांगाची नोंदणी झालेली असून त्यातील 8 हजार 797 दिव्यांगाना विविध प्रकारचे कृतीम साहित्याची आवश्यकता असल्याची माहिती नोंदवली होती. त्याबाबतची तपासणी आरोग्य विभाग मार्फत करण्यात येऊन त्या दिव्यांगांना साहित्य देण्याबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते वर्च्युअल पद्धतीने हा साहित्य वाटपाचा संभाव्य कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सर्व तहसीलदार व सर्व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. तसेच तालुक्यातील दिव्यांग असलेल्या प्रत्येक गावात कशा पद्धतीने वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे त्याबाबत सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. व समाजकल्याण विभागाने यात पुढाकार घेऊन तालुकानिहाय बैठका घेऊन त्याचा अहवाल सादर करावा व या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करावेत, त्यांनी सूचित केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा