मी अनुभवलेले डॉ.विठ्ठल मोरे 

मी अनुभवलेले डॉ.विठ्ठल मोरे


    शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी येथील ७ डिसेंबर २००४ रोजीची माझी मुलाखत अविस्मरणीय, वेगळे वळण देणारी ठरली. मुळातच किल्लारी गावची पहिलीच भेट कुतुहलाने, औत्सुक्याने भारावलेली होती. विलास पाटील यांच्या 'भंगलेले अभंग' मधील कवितांनी उभा केलेला भूकंपाचा भेदक पट मनासमोर पूर्वीच आकारलेला होता. पर्यायाने भूकंपानंतरची किल्लारी, येथील घरांची रचना, भेदरलेली-हादरलेली माणसं, महाविद्यालय व परिसर पाहण्याची ओढ होती. मुलाखतीला जाण्यापूर्वी गुरुवर्य मेजर शांतिनाथ बनसोडे व काँम्रेड काशिनाथ कापसे यांच्याकडून प्रा. डॉ. विठ्ठल मोरे सरांचा महाविद्यालय उभारणीचा उदात्त हेतू विषयीची प्रदीर्घ चर्चा कानावर होती. महाविद्यालयाची छोटीच पण विविधांगी सुविचारांनी रेखाटलेली इमारत पाहिल्यानंतर चर्चेच्या अंगाने चाललेलं माझं निरीक्षण वास्तवाच्या मुळासी पोहचायला लागलं. सरवदे सरांनी घरी केलेल्या दूरध्वनीवरील संपर्कातून मुलाखतीत माझी निवड झाल्याच्या बातमीने घरच्यासह मलाही अत्यानंद झाला. पण नोकरीसाठी द्यावे लागणारे 'डोनेशन' चिंतित करणार होतं. दरम्यानच्या काळात मी अंबेजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात कनिष्ठ प्राध्यापक म्हणून रुजू होतो. किल्लारीच्या कॉलेजला रूजू होण्यापूर्वी वडीलासह लातूर येथील 'मुक्तांकूर' निवासी मोरे सरांची भेट घेतली. 'भूमीचे मार्दव। सांगे कोंभाची लवलव' या संतवचनाची अनुभूती सरांच्या भेटीतून दिसून आली. यापूर्वीही माझ्यासह वडिलांनी अनेक संस्थाचालकांचे उंबरठे झिजवले. त्यांच्या वाणी आणि वर्तनीतून दिसून येणारा संस्थाचालकांचा मिजासपणा सरांच्या वागण्या, बोलण्यात आणि विचारातही दिसून आला नाही. ग्यारंटीची नौकरी म्हटलं की, डोनेशन आलचं या अलिखित नियमानुसार वडीलांनी पिशवीत आणलेले एक लाख रूपये 'महाविद्यालय विकास निधी' या गोंडस नावाखाली टेबलवर ठेवले. तेव्हा सर अक्षरशः चिडून वडिलांना म्हणाले, राऊतजी, इतर संस्था चालकाच्या रांगेत आम्हाला बसवू नका. ऐपत नसताना शेतकरी कष्टकऱ्यांच्या कष्टातून आणि सावकारांच्या व्याजापोटी आलेल्या पैशातून आम्ही या संस्थेची उभारणी केली नाही. कॉलेज उभ करणं हा तर आमच्या जीवनातील मोठा अपघात होता. शिक्षण क्षेत्रातील दुषितीकरण पाहून 'संस्थाचालक' म्हणून मी माझी कुठेही ओळख करून देत नाही. अर्थात माझी ती हिंम्मत होत नाही. एका अपरिहार्य दुःखद प्रसंगात भगतसिंग कॉलेजचा जन्म झाला. कॉलेज च्या माध्यमातून पैसा कमविणे हा आमचा हेतू राहिला असता तर अजून दहा बारा कॉलेज सहजरीत्या काढता आली असती. अगदी कॉलेजचं नाव ठेवताना लोक पणजोबा, आजोबा, वडील, आई या चाकोरीत धन्यता मानतात. पण वयाच्या अवघ्या साडे तेविसाव्या वर्षी फाशीचं चुंबन घेवून तमाम तरूणाईच्या समोर आदर्श ठरणाऱ्या शहीद भगतसिंगांचे नाव जाणीपूर्वक दिल गेलं. आम्ही दोघेही थोडसं संभ्रित व भयभित मुद्रेने सराचं बोलणं मनी पचवित होतो. वडिलांना त्यांच्या विचार-आचाराची जातकुळी लक्षात यायला वेळ लागला नाही. टेबलवरचे पैसे परत पिशवीत गेले. सरांनी परत माझ्याकडे मोर्चा वळवला म्हणाले, भूकंपाच्या गावात कशाला नोकरी करता ? भूकंप कधी होईल सांगता येणार नाही. सध्या जिथे नोकरी करतात तिथे चांगली पगार उचलता. येथे पगाराचा पत्ता नाही. कधी होईल सांगता येणार नाही. यापेक्षा दुसरीकडे चांगल्या जागी प्रयत्न करा. गरज पडल्यास मी मदत करीन. माझी मानसिकता व मूक निर्धार पाहून सरांनी चारित्र्य, नीतिमत्ता, अभ्यास, वाचन व व्यायाम अशा कितीतरी 'विठ्ठलमात्र' सांगल्या. ज्यांनी विठ्ठलमात्रा घेतली त्यांनी काही पथ्य जपली पाहिजे, हे सांगायला विसरले नाही. एका अर्थाने माझ्या यशस्वी घडणीचा पाया भरल्या जात होता.


    सरांच्या प्रदीर्घ भेटीनंतर अनंतफंदीचा फटका सहज मनात डोकावून गेला. 'बरी सुखाची भाजी भाकरी। तूप साखरेची चोरी नको। शहाण्याची चाकरी बरी मूर्ख माणसाची मैत्री नको।।'. लातूरच्या शिवाजी चौकातून आम्ही दोघं गावाकडे निघालो. बसमध्ये बसल्यावर वडीलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहत होते. आजूबाजूचे प्रवासी त्यांच्याकडे सहानुभाव, केविलवाण्या नजरेने पाहत होते. त्या अश्रूंचा संदर्भ माझ्याशिवाय कुणालाही समजणारा नव्हता. मुळातच अस्मानीसुलतानी संकट. शासनाची व्यापारी, भांडवलदार धार्जिनी शेतकरी विरोधी धोरणाने शेतकरी खगत होता. त्यांना शरद जोशी यांच्या शेतकरी संघटने सारख्या चळवळीच्या माध्यमातून बऱ्यापैकी सजगता, आत्मभान आल्याने ऐतखाऊ व्यवस्थेचा त्यांचा लढा चालू होता. शेतकरी पणाची चटके सोसून व्यवस्थेवरील चांगुलपणावरील विश्वास उडत चालला होता. 'एवढे अनर्थ एका अविद्येने केले' हा फुलेंचा विचार इथल्या व्यवस्थेने फोल ठरविला होता. आज प्रा. विठ्ठल मोरे सर यांच्या रूपाने त्यांना फुले विचारांचा खरा वारसदार भेटला होता. मुळात वारकरी संप्रदायाच्या संस्कारांने संस्कारित झालेले वडील आपल्या धोतराच्या सोग्याने डोळे पुसत सहज म्हणून गेले, 'मावली तुम्ही शिकलेली माणसं देव मानता की नाही ? हा तुमचा प्रश्न पण आज विठ्ठल मोरे सरांच्या रूपाने पंढरीचा 'विठ्ठल' भेटला. चांगल्या माणसाच्या रूपात देवपण शोधणारी शेतकरी माणसाची परंपरा मला अनभिज्ञ नव्हती. पण मी नास्तिक का आहे ? ह्या भगतसिंगांच्या विचाराचे वहन करणाऱ्या मोरे सरांनी घरातील देवघर गुंडाळून शेतकरी, कामगारांच्या भलेपणात दैवत्व शोधलं. या भलेपणाच्या पथातून 'क्रातीसूर्य भगतसिंग', 'मार्क्सवादी कर्मयोगी काँम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे', 'काँम्रेड विठ्ठलराव नाईक: संघर्षशील योध्दा' यांचे चरित्र त्यांच्या लेखनीचा विषय ठरू शकली. 


   30 सप्टेंबर 1993 च्या महाप्रलयंकारी भूकंपाने किल्लारीसह बावन्न गाव अक्षरश उद्ध्वस्त झाली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरासह विदेशातूनही मदतीचा ओघ सुरू आला. अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, रासेयोचे स्वयंसेवक, पोलीस व लष्कर आदींच्या माध्यमातून मदत पुरविली गेली. भूकंप पूनर्वसन कामाचा भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून प्रा. डॉ. विठ्ठल मोरे, आ.नरसय्या आडम मास्तर, रवींद्र मोकाशी, कुमार शिराळकर, सुधाकर शिंदे, विश्वंभर भोसले, डॉ.बी.टी.देशमुख यांच्या पुढाकार व कोळसा कामगारांच्या मदतीतून 'येळवट' गावचे पूनर्वसन झाले. भूकंपग्रस्त भागातील मुलांच्या विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाची गरज पाहून डॉ. विठ्ठल मोरे यांना किल्लारीत वरिष्ठ महाविद्यालय उभारणीची गरज वाटली. तत्कालीन स्वाराती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, ना. विलासराव देशमुख यांच्या सहकार्यातून शहीद भगतसिंग महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याचा परिणाम 'चुल आणि मुलं' या चौकटीत अडकणाऱ्या कु. रूपाली माने सारख्या कितीतरी मुली, मुलं स्पर्धा परीक्षेत स्वकर्तृत्व सिध्द करू शकल्या. विद्यापीठ वर्तुळात ग्रामीण भागातील 'आयडाँल' महाविद्यालय बनावे यात मोरे सरांचे दृष्टेपण लपत नाही.


   बार्शीच्या मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात उणीपूरी तीन दशक विद्यार्थी, प्राध्यापकप्रिय पणाचा ठसा सरांनी कोरला होताच. रेणापूर नंतर सरांनी किल्लारीच्या महाविद्यालयात प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळला. विठ्ठल मोरे हे महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक विचारवंत विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, देशपातळीवरील प्राध्यापक संघटनेचे नेते, शिक्षण क्षेत्राला दृष्टी मिळवून देणारे व्यक्तिमत्व असल्याने सरांच्या सहवासात आम्हा सर्वांना आदरयुक्त भीती, दडपण होतं. पण सर्वांसोबत दुपारच्या जेवणासह प्रत्येक कृती कार्यक्रमातही तरुणालाही लाजवेल एवढा सरांचा प्रचंड उत्साह आम्हास अँक्टीव करण्यास मदतगार ठरला. आज महाविद्यालयातील हिरवळ सरांच्या सजगतेचं, आवडीचं फळ आहे. महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी करताना नेहमीच्या सवयीने बेफिकीरपणे आमचं चालणं सरांच्या नजरेतून सुटत नसे. आमची एकूणच तंद्री ओळखून सर मध्येच थांबून म्हणायचे, 'राऊत सर, ही झाडं आपल्याशी बोलतात बर का ? पण ते ऐकण्यासाठी आपणही तेवढचं तंद्रूप होणं गरजेचं. लगेच वाकलेल्या झाडाला काठीचा आधार घेऊन ते सरळ करत. झाडाची सुकलेली पाने पाहून त्याला तहान लागल्यास सूचन करतं. वाघमारे मामाना पाणी द्यायला सांगतं. सरांचं हे मिश्किल बोलणं व वागणं हळूहळू आम्हाला बरंच शिकवत गेलं. कधीकधी गमतीने आपल्या भाषणात ते म्हणत की, 'संसार संसार असतो तरी काय ? संसार चिमणा-चिमणी देखील करतात. आपला संसार समाज कृतज्ञतेचा पार्ट असावा. महाविद्यालयाच्या सर्वहार विकासाचं स्वप्न सरांनी आम्हास दाखवलं. महाविद्यालयाच्या विकास भौतिक, भव्यदिव्य इमारतीपेक्षा तो विद्यार्थी, समाज घडणीच्या कसोटीतून सिध्द झाला पाहिजे, इथून माणसे किती घडली हे माझ्यासाठी महत्त्वाची आहे. भूकंपानंतर उद्ध्वस्त झालेल्या, मानसिक दृष्टीने मुळातून हादरलेल्या माणसांच्या मनात आणि मुठीत जिद्द निर्माण करण्याचा सरांचा प्रयत्न व संघर्ष सर्वार्थाने नतमस्तक होण्यास भाग पाडतो. सरांनी आयुष्यभर दैववाद, नशिबवाद ठोकरून लावला. भगतसिंगाचा विवेकवाद, चिकित्सक विचार एसएफआय सारख्या विद्यार्थी संघटनातून महाराष्ट्रात रूजविला. पुरोगामीत्वाची कास अखेरपर्यंत तेवत ठेवली. दिड महिन्यापूर्वी कळमनुरी तून लालबावट्याच्या तिकिटावर पंधरा वर्ष विधीमंडळात निवडून येणारे काँम्रेड विठ्ठलराव नाईक यांच्या चरित्राच्या अनुषंगाने सरांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. तेव्हा लाँकडाऊनच्या काळात सरकारच्या आकस्मित धोरणाने मुंबई, पुण्यातून रोजगारा अभावी बाहेर फेकल्या गेलेल्या मंजुराविषयी, बीएसएनएल चे खाजगीकरण केल्याने लाखोंच्या वर बेकारीची वेळ येणाऱ्या कामगाराविषयी त्यांचं संवेदनशील लढाऊ मन अस्वस्थ होताना पाहत होतो. मरणानंतर ही त्यांच्या पायवाटेला साजेसं कर्मकांड विरोधी क्रियाकर्म त्यांच्या सुविद्य पत्नी प्राचार्या डॉ. कुसुमताई पवार-मोरे, डॉ. संग्राम मोरे, डॉ. क्रांती मोरे व परिवारांनी केले. सरांच्या रक्षाअस्थी ओढे-नदीत टाकून पाणी प्रदुषित करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात खड्डे करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. आज काकुंचं शोकाकुल सभेतलं मनोगत तुमच्या उपजत, सात्विक, निष्ठावान विचारधारेचा जय म्हणता येईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काल दिवसभर येणाऱ्या फोनमधील संवादातून दादा, आपलं अचानक जाणं माझ्यासारख्या कितीतरी जणांना पोरक करून गेलं. कबीरांनी म्हटलं ना, 'हम आये तो। रोते रोते आये।। ऐसी करणी करो, हम जाये तो। सारा जग रोये।।'. दादा, खरचं तुम्ही आम्हाला, प्राध्यापक संघटनेला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विचारधारेला रडवलतं.


                  - डॉ. ज्ञानदेव राऊत. 


शहीद भगतसिंग महा, किल्लारी लातूर.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज