राज्यकर्त्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा  : धरणे आंदोलनाच्या माध्यमातून माजी मंत्री निलंगेकरांची आघाडी सरकारवर टीका

राज्यकर्त्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा 


धरणे आंदोलनाच्या माध्यमातून माजी मंत्री निलंगेकरांची आघाडी सरकारवर टीका


लातूरः-  कोरोना बाबतीत गंभीर नसलेल्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता परेशान झालेली असतानाच राज्यकर्ते मात्र क्वॉरईटन झालेले पहाण्यास मिळत आहेत. औषधांचा तुटवडा व ऑक्सीजनचा अभाव यामुळे कोरोनामुळे मृत्यू पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे कोरोनाने जनता परेशान असताना दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी हैराण झालेला आहे. मात्र राज्य सरकारला याचे कांहीच घेणे-देणे नाही. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याने राज्यकर्त्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.


शहर भाजपाच्या वतीने विविध मागण्यासाठी येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी आ. निलंगेकर बोलत होते. सदर आंदोलनात माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, शहर जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शहर जिल्हा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्रेरणा होनराव, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा मिना भोसले, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, माजी महापौर सुरेश पवार, माजी उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, उपाध्यक्ष महेश कौळखेरे, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, सुधीर धुत्तेकर, स्वाती जाधव, नगरसेविका सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. रागिनी यादव आदिंसह विविध मंडल अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोरोना संसर्गाने गेल्या सहा महिन्यापासून धुमाकूळ घातलेला असल्याचे सांगत हा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीच ठोस पाऊले उचलली नसल्याचे आ. निलंगेकरांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने याबाबत ठोस पाऊले उचलणे अपेक्षीत असतानाच राज्यकर्ते मात्र क्वॉरईटन झालेले पाहाण्यास मिळते. राज्यात कोरोनासाठी आवश्यक असणारी औषधे यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून ऑक्सीजनची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात कोरोनाने मृत्यू पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याला केवळ आणि केवळ राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगत त्यामुळेच निष्क्रीय राज्यकर्त्यांवर मनुष्यवधाचा म्हणजे 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. निलंगेकरांनी यावेळी केली.


एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी परेशान झालेला दिसून येत आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने दिलासा देणे आवश्यक असतानाही अजूनही अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची व इतर नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्याचे पाहाण्यास मिळत नाही असे आ. निलंगेकरांनी यावेळी सांगितले. कोरोनाने सर्वसामान्य जनता त्रस्त असून अतिवृष्टीने शेतकरी परेशान आहे. तरीही राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधीपक्ष या नात्याने आम्ही आता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. गेली सहा महिने राज्यकर्त्यांना सहकार्या केले असून आता जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगून आ. निलंगेकर यांनी राज्यकर्त्यांनी लवकरच याबाबत ठोस निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा व शेतकर्‍यांना मदत नाही मिळून दिल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आ. निलंगेकर यांनी दिला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आमची सत्ता आल्यास महिनाभरात उजनीचे पाणी देऊ असे आश्वासन लातूकरांना दिले होते. मात्र सहा महिने लोटले असले तरी अजूनही उजनीच्या पाण्याबाबत कोणतीच हालचाल पालकमंत्र्याकडून पहाण्यास मिळत नाही. सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर तुम्हाला पडला असला तरी आम्ही ते विसरलेले नसून जनतेसाठी उजनीचे पाणी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच पालकमंत्र्यांनी उजनीचे पाणी लातूरला दिल्यास आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असे आवाहनही माजी पालकमंत्री आ. निलंगेकरांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांना दिले आहे.


यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, शहर जिल्हा संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, माजी उपमहापौर देविदास काळे, व्यंकट पन्हाळे आदिंनी राज्यकर्त्यांच्या अपयशाचा पाढा वाचला. धरणे आंदोलानंतर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळने जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून लातूरला उजनी धरणाचे पाणी मिळावे, मराठा आरक्षण तात्काळ लागू करावे, कव्हा येथील विभागीय क्रिडा संकुलाचे काम तात्काळ सुरु करावे, राज्य सरकारने कोरोनाच्या पाश्वभुमीवर सर्वसामान्यांना तात्काळ मदत करावी, लॉकडाऊन काळातील विद्युत देयके माफ करावी, राज्यात कोरोनासाठी आवश्यक असणारे औषधे व ऑक्सीजनचा मुबलक पुरवठा करून कोरोनाग्रस्तांची लुबाडणूक तात्काळ थांबवावी आदि मागण्या केलेल्या आहेत.