राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा :
खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
उदगीर : महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वरचे राज्य होते, परंतु महायुतीच्या सरकारच्या काळात हे राज्य 6 व्या क्रमांकावर गेले असून आगामी काळात राज्याचे हित जोपासण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उदगीर विधानसभा मतदार संघातील 1,,
आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ तालुका क्रीडा मैदानावर आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी या व्यासपीठावर माजी मंत्री आ. अमित देशमुख, खा. फॊजिया खान, माजी खा. सुधाकर शृंगारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, माजी उपाध्यक्ष ऍड. संभाजीराव पाटील, माजी आ. शिवराज तोंडचिरकर, धर्माजी सोनकवडे, उषा कांबळे, लक्ष्मीबाई भोसले, शिवाजी हुडे, प्रीती भोसले, अंजुम कादरी, चंदन पाटील नागराळकर, शिवाजी मुळे, कल्याण पाटील, बाबू बिरादार, सचिन केंद्रे, गजानन सताळकर, अजय शेटकार यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत हे चुकीचे आहे. महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात अव्वल स्थानावरील राज्य म्हणून ओळखले जायचे, मात्र आज राज्यातील अनेक उद्योग गुजरातमध्ये वळविण्याचे काम सुरू आहे अशी टीका करून आज महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली राहिली नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, अनेक महिला व मुली गायब झाल्याचे चित्र आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यकर्त्यांना याकडे पाहण्यासाठी वेळ राहिला नसल्याचे यावेळी पवार म्हणाले. आज या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेत असतात, मात्र सरकार कडून या पिकाला देण्यात येणारी किंमत यामुळे हा शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. या जबाबदारीपासून आजचे राज्यकर्ते दूर चालले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर आज वाईट वेळ आली आहे. ही परिस्थिती सुधारून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज आहे असेही खा. शरद पवार यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी खा. शरद पवार यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडी जन्माला आली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेतेमंडळी एकदिलाने काम करीत असून महाविकास आघाडीला सत्तेवर आणा आम्ही तुमचे प्रश्न सोडवू असे आवाहन केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या मालाला आधारभूत किंमत देणे आवश्यक असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हा निर्णय घेणार असल्याचे आ. देशमुख म्हणाले. उदगीर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ना. संजय बनसोडे यांना खा. शरद पवार यांनी मोठे केले असून त्यांना धोका देऊन ते भाजपच्या विचारासोबत गेले येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुधाकर भालेराव यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही यावेळी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी केले.
बस्वराज पाटील नागराळकर यांच्या मनातील खदखद आ. अमित देशमुखांनी बोलुन दाखविली....
गेल्या अनेक वर्षांपासून आपण अनेक उमेदवारांच्या जाहीर सभा गाजवीत आहोत पण आपल्याला कधी संधी मिळाली नाही अशी मनातील खंत बस्वराज पाटील नागराळकर यांनी आपल्याकडे बोलून दाखविली असून आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना विधानपरिषद सदस्य म्हणून संधी द्यावी अशी विनंती आ. अमित देशमुख यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुधाकर भालेराव म्हणाले की, या भागातील मतदारांनी मला दोनदा आमदार म्हणून संधी दिली. या दहा वर्षाच्या काळात आपण मतदारांची प्रामाणिकपणे सेवा केली. या भागात अनेक विकासाच्या योजना आपण आणल्या आहेत मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी त्या योजनांचे श्रेय घेत आहेत असा आरोप ना. संजय बनसोडे यांच्यावर भालेराव यांनी केला. भारतीय जनता पक्षातुन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. पवार साहेबांनी विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे. आता जबाबदारी मतदार राजाची असून आपल्याला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन केले. दहा वर्षे आपण आमदार नसताना देखील आज एवढया मोठ्या संख्येने मतदार उपस्थित झाले याबद्दल माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी खा. फौजिया खान, बस्वराज पाटील नागराळकर, संजय शेटे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.
सभेचे सूत्रसंचालन ऍड. पद्माकर उगीले यांनी केले तर आभार अजीम दायमी यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा