लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे

 लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगेलातूर : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करून निवडणूक शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर लोकसभा मतदार संघात 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या असून  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


लातूर लोकसभा मतदारसंघात 15 मार्च 2024 रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण 19 लाख 69 हजार 177 मतदार असून एकूण 2 हजार 125 केंद्रांवर मतदान होईल. या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचालित मतदान केंद्र आणि युवा संचलित मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यात 138 पडदानशिन मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणूक लढविणारे उमदेवार, राजकीय पक्षांना प्रचारासाठी वाहन परवाना, उमेदवाराचे प्रचार कार्यालय, सभा, लाउडस्पीकर व इतर अनुषंगिक बाबींसाठी घ्यावयाच्या परवान्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक खर्च, तक्रार निर्वाण, स्वीप, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती यासह विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यात 240 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 42 भरारी पथके, 36 स्थिर पथके, 6 व्हिडीओ पथके आणि उमेदवारांच्या प्रचारावर निगराणी करण्यासाठी 18 पथके स्थापन करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. गतवेळी मतदान कमी झालेल्या मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


*असा आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम*


भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध होणार असून 19 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 एप्रिल 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. तसेच 22 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधी राहील. 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 जून 2024 रोजी होईल.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image