*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
*४ सप्टेंबरला बुद्ध विहार उद्गाघटन व महिलांचा आनंद मेळावा*
*क्रीडामंत्री संजय बनसोडे; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून आढावा*
लातूर, : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रथम आगमनासाठी ऐतिहासिक उदगीर नगरी सज्ज झाली आहे. चार तारखेला होणाऱ्या बुद्ध विहार उद्घाटन व महिलांच्या आनंद मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभा राहिला आहे. बुद्ध विहार लोकार्पणासाठी सज्ज असून आज पूर्ण परिस्थितीचा आढावा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घेतला.
राष्ट्रपती महोदयांचा महाराष्ट्राच्या दौऱ्याची आजपासून सुरुवात झाली आहे. बुद्धविहाराचे लोकार्पण व महिलांचा आनंद मेळावा नियोजित वेळेवर व्हावा, यासाठी प्रशासन ताकदीने कामाला लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लभार्थी महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राज्यातील पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी होत आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे,महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे, यासाठी विविध शासकीय योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
महाराष्ट्रात प्रथमतः या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उदगीरमध्ये पोहचत आहेत.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आज या आयोजनाच्या शेवटच्या टप्प्यात सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी केली. राष्ट्रपतींचा हा पहिलाच उदगीर दौरा असून तो स्मरणीय बनावा यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. आज या दालनाची ही पाहणी मान्यवरांनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजना यासारख्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपतींचा थेट संदेश ऐकण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार असल्यामुळे या कार्यक्रमांची महिला जगतात प्रचंड उत्सुकता आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा