उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
उदगीर : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधण्यासाठी “ स्वाभिमान संवाद यात्रा “ काढणार असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक अजित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या यात्रेचा आज दि. 29 रोजी सायंकाळी 4 वाजता उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातून प्रारंभ होणार आहे. 10 दिवसात ही यात्रा मतदार संघातील जवळपास 60 गावामध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधणार असल्याचेही अजित शिंदे म्हणाले.
उदगीर विधानसभा मतदार संघात नागरिकांना भेडसावणारे अनेक प्रश्न उपेक्षित राहिलेत. तसेच अनेक नवीन प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, कामगार, छोटे व्यापारी आणि समाजातील अनेक वंचित घटकांच्या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे आज जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती आणि नगरपालिकेत कोणीही राहिले नाही. प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रशासक नेमलेले आहेत. जनतेला सर्वत्र भ्रष्टाचार व पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळ व अतिवृष्टीला तोंड द्यावं लागत आहे. पिकविमा कंपनी कसलीच दखल घेत नाही. बाजारात शेतमालाला भाव नाही आणि महागाईने शेती परवडत नाही अशी भावना सर्वत्र दिसून येते. कृषी निविष्ठांवर जीएसटी सारखे कर लावल्यामुळे आणि डिझेल महाग झाल्या मुळे शेतीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. सिंचनासाठी एक सुद्धा नवीन साठवण तलाव निर्माण झाले नाही. रब्बी हंगाम ऐन भरात असताना तळ्यावरच्या मोटारीचे कनेक्शन तोडण्यात येते. तेरु नदीवरील बॅरेजेस निकृष्ट दर्ज्याचे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे फाउंडेशन मधून लिकेज होऊन धरण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच रिकामे होत आहेत.
दूध भुकटी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींकडून कसलीच मदत होत नाही. उलट आहे ती यंत्र सामग्री मोडीत काढण्याचे प्रयत्न सरकार करत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आज मरणासन्न अवस्थेत आहेत. महाविद्यालयात प्राध्यापकांची रिक्त पदे अनेक वर्षांपासून भरण्यात आलेले नाहीत. व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या गुणवत्तापूर्ण संस्थांचे गेल्या डिसेंबर महिन्यात खाजगीकरण करण्यात आले. या संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता शासकीय अर्थसाह्य मिळणार नाही. केवळ पैशेवाले लोक आता गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतील अशी परिस्थिती युती शासनाने करून ठेवली आहे. पाच वर्षांपूर्वी मजबूतीकरण करण्यात आलेली उदगीर येथील जिल्हा परिषदेची शाळा विनाकारण पाडण्यात आली. आणि त्याठिकाणी लावण्या आणि तमाशे भरवले जात आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. बदलापूर पासून आपल्या शहरापर्यंत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आरक्षणासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अत्यंत वाईट राजकारण सुरु आहे. अल्पसंख्य समाज अस्वस्थ आहे. अनुसूचित जातीच्या आरस्क्षणात सुद्धा विनाकारण ढवळाढवळ केली जात आहे.
उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन, एमआरआय, डायलिसिस आणि तत्सम अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. अगदी सध्या सुध्या औषधांचा सुद्धा पुरवठा शासकीय रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरळीत पणे होत नाही.
या व अश्या अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात उदगीरची जनता त्रस्त असताना अनेक इच्छुक उमेदवार मुंबई पुण्याहून उदगीरच्या वेशीवर येऊन उभे राहिले आहेत. पूर्वी सार्वभौम राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी फौज फाटा व दारू गोळा घेऊन परकीय आक्रांत येत असत. परंतु आज यासाठी केवळ वाम मार्गाने कमावलेला पैसा पुरेसा आहे. अश्या समजुतीत उदगीरची ऐतिहासिक भूमी अंकित करण्यासाठी अनेक गारदी आपल्याकडे कूच करत आहेत. आपलं मत हे आपलं स्वाभिमान आहे. आणि हे लोक आपलं हेच मत आपलं स्वाभिमान विकत घ्यायला येत आहेत. परंतु उदगीरची जनता ही स्वाभिमानी आहे विकाऊ नाही. अश्या परिस्थितीत इथल्या मतदारांच्या हिताचा, स्वाभिमानचा आणि संघर्षाचा संवाद साधण्यासाठी ही “स्वाभिमान संवाद यात्रा” काढण्यात येत असल्याचे यावेळी अजित शिंदे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते आशिष पाटील राजूरकर उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा