तर त्या शिक्षकांवर कार्यवाही : राहूल केंद्रे उदगीर: लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न असून वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणता शिक्षक वर्गात मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्यास त्या शिक्षकावर जिल्हा परिषद कार्यवाही करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली. उदगीर येथील पोस्ते मंगल कार्यालयात मलकापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात राहुल केंद्रे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे होते. व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड,बापूराव राठोड, उपसभापती रामराव बिरादार, पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. मल्लेश झुंगा , प्रा . सिध्देश्वर पटणे, प्रा . प्रदीप वीरकपाळे, सरपंच प्राची भालेराव यांची उपस्थिती होती . प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्देश्वर पाटील यांनी केले . प्रास्ताविकात त्यांनी मलकापूर गावातील अडचणी जिल्हा परिषद अध्यक्षासमोर मांडून त्या सोडवाव्यात अशी मागणी केली . यावेळी बोलताना राहुल केंद्रे यांनी जिल्हा परिषद ही सर्वसामान्य माणसाला सर्व योजना देणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून सामान्यांचे हित साधण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगत मलकापूर करांचे सर्व प्रश्न मार्गी लावत असतानाच जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न लवकरच मिटविला जाईल अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून सर्वात कमी वयात काम करण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करीत प्रामाणिक व पारदर्शी कारभार करून उदगीरची शान व मान वाढवू असेही यावेळी राहुल केंद्रे म्हणाले.