अन्न व पाण्याच्या शोधात मुक्या जनावरांची भटकंती कोरोनाचा परिणाम:

अन्न व पाण्याच्या शोधात मुक्या जनावरांची भटकंती
कोरोनाचा परिणाम:
उदगीर : सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केल्यामुळे नागरिकांना तर उपासमारीला सामोरे जावे लागतच आहे पण मुक्या जनावरांची अवस्था त्याहून बिकट झाली असून ही मुकी जनावरे अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
उदगीर शहरात मोकाट फिरणारी जनावरे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामध्ये गायी, कुत्री ही जनावरे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असतात. रस्त्यावर नागरिकांनी टाकलेल्या अन्नावर यांची गुजराण होते. शहरातील हॉटेल्स, विविध दुकानातील व्यापारी या जनावरांची भूक भागवितात. शिवाय काही नागरिक घरातील उरलेले अन्न रस्त्यावर टाकतात. यावर या मोकाट जनावरांची भूक भागते. गेल्या पंधरा दिवसापासून संचारबंदी लागू झाल्यामुळे शहरातील सर्व हॉटेल्स, दुकाने बंद असल्याने या मुक्या जनावरांना खायला अन्न मिळत नाही व पाणीही मिळत नाही. त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याचे पाणीही जनावरांना मिळत नाही. या मुक्या जनावरांना आपल्या भावनाही व्यक्त करता येत नाही. त्यामुळे ही मुकी जनावरे जथ्था करून एकत्र रस्त्यावरुन हिंडत अन्न पाण्याच्या शोधात फिरत आहेत.
एकीकडे संचारबंदीमुळे उपासमार होत असलेल्या नागरिकांना अनेक सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था व प्रशासन अन्न धान्य पूरविताना दिसत आहेत. तर दुसरीकडे या मुक्या जनावराकडे कोणी लक्ष देत नाही. प्राणी प्रेमी नागरिक आता कोठे आहेत असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.