महात्मा बसवन्नांचा जन्मोत्सव घरी राहून साजरा करा : ना.संजय बनसोडे
**********************
उदगीर : एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे असा दिव्य संदेश देणाऱ्या समतानायक जगतगुरु महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरात बसून साजरी करावी, असे आवाहन ना.संजय बनसोडे यांनी केले आहे.
संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आमचे सरकार व प्रशासन अनेक प्रकारचे प्रयत्न करीत आहे. तेव्हा आपल्या सण व उत्सवांचे महत्व असले तरी यंदाच्या जयंती उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. तेव्हा निराश होऊ नका, महात्मा बसवेश्वर यांच्या आशीर्वादाने आपण या संकटावर लवकरच मात करणार आहोत. तेव्हा यंदा मिरवणूक किंवा सार्वजनिक जयंती साजरी न करता आपल्या घरात बसून जयंती साजरी करावी, असा भावनिक संवाद ना.संजय बनसोडे यांनी बसवभक्तांसोबत साधला आहे.
एकमेकांच्या पाया पडू नका. शरणूशरणार्थी म्हणा. संन्यासवादाचे उदात्तीकरण करू नका. संसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा, दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका असा जगाला संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची जयंती घरीच साजरी करू या, असा आग्रहाचा सल्ला ना.संजय बनसोडे यांनी दिला.
आपण दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करीत असतो पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे आपल्या उत्साहाला मर्यादा आली आहे. तेव्हा प्रत्येकाने घरातच जयंती साजरी करावी असे आवाहन ना.संजय बनसोडे यांनी केले आहे.
राज्य सरकार व प्रशासन सर्व पातळीवर या संकटाचा मुकाबला करीत आहे. तेव्हा प्रत्येकाने सामाजिक आरोग्य कायम राखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी. कोरोनाचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग व होम क्वारंटाईन हेच सर्वोत्तम उपाय आहेत. तेव्हा सर्वानी सामाजिक हित व देशाचे हित नजरेसमोर ठेवून डॉक्टर, सरकार व प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. स्वतः घराबाहेर पडू नका, घरातील कोणालाही घराबाहेर पडू देवू नका. बसवभक्तांना दासोह नव्याने सांगण्याची गरज नाही, आपल्या परिसरात कोणी उपाशी असेल तर त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करुन द्या. घरपोच रेशन पुरविले जात आहे, ते सर्वांना भेटत आहे की नाही याकडे लक्ष ठेवा, जर कोणाला भेटत नसेल तर प्रशासनाच्या नजरेस आणून द्या.
विविध संस्था व व्यक्ती अन्नदान करीत आहेत, त्यांना सहकार्य करा. प्रत्येक गरजवंताला अन्न भेटावे यासाठी प्रयत्न करा. आपल्या कुटूंबात किंवा परिसरात कोणालाही कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांना किंवा प्रशासनाला कळवावे असेही ना.संजय बनसोडे यांनी आवाहन केले आहे.
- ना.संजय बनसोडे, राज्यमंत्री, महाराष्ट्र
addComments
टिप्पणी पोस्ट करा