*55 वर्षाच्या पुढील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी  -राज्यमंत्री संजय बनसोडे*

55 वर्षाच्या पुढील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी 


-राज्यमंत्री संजय बनसोडे


लातूर :- कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 55 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची यादी तयार करुन त्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन पर्यावरण, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.


उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी श्री. बनसोडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरिदास यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.


राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषत: उदगीर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे; त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील 55 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची यादी तयार करावी व त्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, असे त्यांनी सूचित केले.


कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवत असताना महसूल विभाग, पोलीस विभाग व आरोग्य यंत्रणा ने परस्परात योग्य तो समन्वय ठेवावा व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले. तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, नर्स आदींनी त्यांना संसर्ग होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी व कोरोना च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेली सर्व पदे त्वरित भरण्यात बाबतची कार्यवाही करावी असेही सूचना त्यांनी केली.


जिल्ह्यातील सर्व विभागांनी परस्परांमध्ये योग्य तो समन्वय ठेवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना च्या अनुषंगाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. तसेच पोलीस विभागाने उदगीर शहरात व जिल्ह्याच्या इतर शहरी भागात गर्दी कमी प्रमाणात राहील याबाबत खबरदारी घ्यावी व सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त चोखपणे ठेवावा असेही त्यांनी सूचित केले.


प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक अतिरिक्त वर्ग 1 चा पर्यवेक्षकीय अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी सूचना आयुक्त केंद्रेकर यांनी प्रशासनाला केली. कंटेनमेंट झोन चा परिसर कमी करावा व झोनमधील जास्तीत जास्त लोकांची स्क्रीनिंग करावी असेही त्यांनी सूचित केले.


जिल्ह्यातील प्रत्येक चेक पोस्टवर अल्सो प्लस मीटर, पॅरामेडिकल टीम, स्कॅनर असावेत. तसेच जिल्ह्यात निर्माण केलेल्या आयसोलेशन वार्डमधील लोकांची योग्य ती काळजी घ्यावी. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यावर अधिक भर द्यावा. तसेच कोरोना च्या अनुषंगाने लोकांचे प्रबोधन मोठ्याप्रमाणावर करुन शारीरिक अंतर( फिजिकल डिस्टन्स) पाळण्याबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना आयुक्त श्री केंद्रेकर यांनी दिल्या. टंचाईच्या अनुषंगाने रोजगार हमी योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्याला देण्यात आलेले सहाशे सिंचन विहिरी चे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश श्री केंद्रेकर यांनी दिले. जिल्हा प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याचे श्री केंद्रेकर यांनी नमूद केले.


यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची सविस्तर माहिती बैठकीत दिली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उदगीर शहरातील कंटेनमेंट झोन भागाला भेट देऊन त्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व मार्गदर्शक सूचना दिल्या.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image