विलासरावांच्या शेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा.. लातूर जिल्हा परिषदेचा ठराव

विलासरावांच्या शेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा..


लातूर जिल्हा परिषदेचा ठराव


लातूर: जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या काँग्रेसचे दिवंगत नेते स्व. विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतल्याशेजारी भाजपाचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा ठराव लातूर जिल्हा परिषदेने घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.


16 जून 2020 रोजी लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्या शेजारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.


महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दो हंसो का जोडा‘ अशी ज्यांची ओळख आहे, ते दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे आता लातुरात पुतळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. वेगवेगळ्या पक्षात, प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे पक्के मित्र म्हणून हे दोघेही परिचित होते. अगदी विद्यार्थी दशेपासून ते महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे खुमासदार किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. अशा या मित्रांना आता पुतळ्याच्या रुपातही एकत्र आणण्याचा निर्णय जिल्हा लातूर परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात देशमुख यांच्या शेजारीच मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून तसा सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या पश्चात देखील चर्चिले जातात. हे दोघे एका व्यासपीठावर येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच असायची. अगदी ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरूवात झाली असली तरी त्यांची मैत्री मात्र त्याही आधीची म्हणजे महाविद्यालयापासूनची होती. दोघे पुण्याला शिकायला असल्यामुळे त्या काळातील गंमतीजमती हे दोघे एकत्र आल्यानंतर आपल्या भाषणातून सांगायचे.


राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कडची हवा अनुभवली. तर गोपीनाथ मुंडेचा प्रवासही असाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे पुढे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. दोघेही नेहमी विरोधी पक्षात राहीले, पण पक्ष त्यांच्या मैत्रीच्या आड कधी आलाच नाही. पण या दोघांची खऱ्याखुऱ्या आयुष्यातील एक्झीटसुध्दा मनाला चटका लावणारी ठरली होती.


आता दोघेही हयात नाहीत, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेतील विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारून या दोघांच्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल.


मंगळवारी सर्वसाधारण सभेत माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी हा ठराव मांडला.या ठरावाला काँग्रेस पक्षातर्फे नारायण आबा लोखंडे, राष्ट्रवादी पक्षातर्फे माधव जाधव, भाजप तर्फे जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, बांधकाम सभापती संगीता घुले, महिला व बालविकास सभापती ज्योती राठोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, रामचंद्र तिरुके, डॉ.संतोष वाघमारे यांनी अनुमोदन दिले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.


पुतळ्यासाठी साठ लाख रूपये खर्च येणार असून राजकारणात कटुता वाढू नये या हेतूने तो उभारण्यात येणार असल्याचे सांगत जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. .


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज