५० वर्षांवरील सर्व उदगीरकरांची आज आरोग्य तपासणी
----------------------
१८५ पथकांमार्फत तपासणी: डॉ. अरविंद लोखंडे
----------------------
उदगीर: शहरातील ५० वर्षांवरील सर्व नागरिकांची आज रविवार दि.२८ जून रोजी १८५ पथकांमार्फत घरोघरी जावून आरोग्य तपासणी करण्यात येणार असून नागरीकांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे.
उदगीर शहरात आतापर्यंत १०० च्या वरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात ६ जणांचा मृत्यूही झाला आहे. शहरात यापुढे कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणुन प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत शहरातील ५० वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, या तपासणीत पल्स मीटर, थर्मामीटर अश्या अद्यावत उपकरणाने तपासणी करण्यात येणार असल्याचे लातूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ लोखंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, डॉ. हरिदास, गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, डॉ. रामप्रसाद लखोटीया, डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
उदगीर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व नगरपालीका प्रशासनाच्या वतीने शहरातील ५० वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांची आज रविवारी एकाच दिवशी दिवसभर आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील कोरोना परिस्थिती पाहता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथील ५० वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना केल्याने ही विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.
उदगीर शहरात ज्येष्ठ नागरिकांची सुमारे २० हजार इतकी संख्या असून या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी १८५ पथक गठित करण्यात आलेली आहेत. या पथकामध्ये एक वैद्यकीय कर्मचारी असून त्यांच्या मदतीला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, इतर कर्मचारी व शिक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेले आहेत. या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेसाठी उदगीर शहराची एकूण सहा उपविभागात विभागणी करण्यात आलेले आहे. यासाठी तालुक्यातील हेर, देवर्जन, नळगीर , वाढवणा, हंडरगुळी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, नगरपालिका कर्मचारी यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. उदगीर शहरात आजपर्यंत कोरोनामुळे सहा जणांचा बळी गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने एकाच दिवशी सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून
या विशेष मोहिमेत आरोग्य पथके प्रत्येक घरात जाऊन घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आजाराची माहिती घेत ऑक्सीप्लस मीटर , थर्मल स्क्रीनिंग द्वारे आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. मेंगशेट्टी व तहसीलदार मुंडे यांनी यावेळी सांगितले.
--------------------------------------------------------
कोरोनाच्या संसर्गामुळे बळी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने आखलेली एका दिवसात आरोग्य तपासणी ही संकल्पना मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग आहे. संबंध लातूर जिल्ह्यात संबंधित कर्मचारी दररोज ठिकठिकाणची तपासणी करत आहेत. मात्र सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या उदगीर शहराची एकाच दिवशी तपासणी हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग असून जेष्ठ नागरिकांनी सदर आरोग्य तपासणी मोहिमेस सहकार्य करावे असे डॉ. लोखंडे म्हणाले.
--------------------------------------------------------
addComments
टिप्पणी पोस्ट करा