मी मुख्याधिकारी लिहतोय..

मी मुख्याधिकारी लिहतोय...


 


     सर्व उदगीर च्या जनतेस माझा सस्नेह नमस्कार. मित्रांनो ,23 मार्च पासून ते आज 25 जुलै पर्यंत लॉकडवून चे 125 दिवस झाले, पण कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव मात्र कमी व्हायला तयार नाही याउलट प्रत्येक दिवस नवी आव्हाने घेऊन येत आहे.आम्ही त्याच्याशी लढत आहोत पण जिंकत नाहीत, कोरोनाने आपल्या संसर्ग होण्याची पध्दत अतिशय वेगाने व घातकपणे आता बदलली आहे पण आम्ही मात्र आमच्या वागण्यात, राहणीमानात बदल केला नाही. कोरोना आता समूह संसर्ग पध्दतीने आपले हातपाय तळागाळापर्यंत पसरवतोय .यामुळे आपल्याला ही बदलायला हवे होते पण तसे झाले नाही याउलट आपण अधिक निडर होऊन कोरोना या भयंकर रोगांची जणू गळाभेट घेण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत. अनावश्यक गर्दी करत विना मास्क बिनधास्तपणे दुचाकीवरून फिरणारी आपलीच उनाड मूले,अत्यावश्यक नसतानाही खरेदीसाठी बेफाम गर्दी करणारेही आपणच असतो . वृद्धांना तर सर्वात जास्त धोका तरी घरी करमत नाही म्हणून बाहेर गर्दीत फेरफटका मारतातच मग आपणच सांगा, कोरोना कसा कमी होणार? आपल्या कडे रुग्ण बरा होतोय, ही एक समाधानकारक बाब असली तरी मृत्यु ही कमी नाहीत. तुम्ही बरे होणाऱ्या रुग्णाला पाहताय पण मी मात्र दुर्दैवाने दररोज मृत्यूला जवळून पाहतोय.माझे जीवाभावाचे कर्मचारी हे खरे कोरोना योद्धे आहेत,माझ्या सोबत सावली सारखे कायम सोबत आहेत. कोरोनाचा रुग्ण सापडलेला परिसर आम्ही सील करतोय आणि कोरोनाने बाधित रुग्णांचा अंत्यविधीही आम्हीच करतोय , होय मान्य आहे ते आमचे कामच आहे पण हे करताना आलेला अनुभव ती भयानकता त्या वेळची मानसिकता हे तुम्हाला कळायला नको का?


   25 जुलै ही तारीख आणि हा दिवस माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही. त्याचे कारण ही तसेच आहे म्हणा ! नागपंचमीचा सणाचा दिवस,पत्नीची सकाळपासून लगबग सुरू होती आणि मी आज तरी घरी निवांत राहावे ही अप्रत्यक्ष मागणी. तितक्यात रोजच्या प्रमाणे सकाळी 7 वाजता फोन खणखणला, पाहिले तर सिव्हिल हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा होता विचार करतच घेतला की काय काम असावे? तिकडून निरोप दिला की, साहेब दोन रुग्ण मृत्यू झालेत, अंत्यविधी करावं लागेल .पत्नीला थोड्या वेळासाठी जाऊन नास्त्यासाठी परततो ,हे कसेबसे सांगून मागे वळून न पाहता घराबाहेर पडलो .


     मी लगेच आमच्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला व अंत्यसंस्कारासाठी लाकडे, पीपीई किट आदी आमची तयारी सुरु झाली होती. तेवढयात पुन्हा 9.30 वाजता दवाखान्यातुन फोन आला समोरच्याने निरोप दिला," साहेब ,आणखी दोन व्यक्ती चा मृत्यू झाला आहे आणि अजून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे." हे एवढ्यावर थांबले नाही .आधीच्या चार मृत्यूची अंत्यविधीची तयारी करे पर्यंतच काही वेळातच अजून दोघांच्या मृत्यूचे निरोपही आले होते. 


     माझ्या डोळ्यासमोर एक क्षणासाठी अंधारी आल्याचा भास झाला, दोन शेडचे सार्वजनिक स्मशानभूमी आणि 6 जणांचे अंत्यविधी ? जागा उपलब्ध नव्हती आणि सर्व विधी ही करणे गरजेचे होते.माझे कर्मचारीच नव्हे तर मी ही मनातून हादरलोच होतो. नातेवाईकांचा दूरवरून आक्रोश आणि मृत्यू चा थैमान चालूच होता.शेवटी सरकारी कर्मचारी ही माणूसच असतो .आज सणाचा दिवस ,घरी गोडधोड करून कुटुंबीय जेवण्यासाठी आमची वाट पाहत होते पण आम्ही मात्र प्रेतांच्या राशीत उभे होतो .हिरमुसलेल्या कर्मचाऱ्यांना हिंमत दिली आणि निर्णय केला आता वेळ न घालवता एकापाठोपाठ एक अंत्यविधी करायची. 


   तयारी सुरू केली ....चिता(सरण) रचल्या जात होत्या... एका मागे एक मृतदेह आणले जात होते... मित्रांनो मला ही माहिती नव्हते की कोणती चिता कोणाची आहे ...नातेवाईकांचा आक्रोश, किंकाळ्या ही मला आता ऐकू येत नव्हत्या.... माझे कान व मन ही आता बधीर झाले होते माझ्यातला माणूस व माझं मन सुन्न होऊन निर्जीव पणे जळणाऱ्या चितेकडे पहात होते. खरे तर हताशपणे पाहण्याशिवाय मी ही काहीच करू शकत नव्हतो.चितेच्या आगीचे डोंब आकाशाकडे झेपावत होते जणू काही मृत्यू जिंकल्यासारखा हसत होता..आणि आम्ही निःशब्द पणे पहात होतो.. तेवढयात विजा चमकू लागल्या, ढगांचा गडगडाट सुरू झाला कदाचित मृत्यूचे ते असूरी हास्य निसर्गाला ही मान्य नव्हते.. आणि जोराचा पाऊस सुरू झाला जणू तोही हे विदारक दृश्य पाहून रडत होता. तो 5 ते 7 मिनिटे कोसळला आणि पुन्हा आपला ओलावा सोडून निघून गेला. चिता ही आता राखेत बदलत होती.. मी मात्र निर्विकारपणे पहात होतो.. हतबल होऊन रस्त्यावर आलो तर पुन्हा तीच गर्दी, तेच मोकाटपणे बाहेर फिरणारे टवाळखोर जणू अमरत्वाचे वरदान कपाळावर घेऊन आले असे बिनधास्त !


 पण मला सारखे भासत होते आताच पाहून आलेला तो मृत्यू या गर्दीत नवी शिकार शोधतोय आणि हा कोरोना आता पुन्हा वेताळासारखे कोणाच्या तरी खांद्यावर बसेल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबात दाखल होईल.मी फक्त त्या गर्दी कडे पहात होतो आणि स्वतः लाच सावरण्याचा प्रयत्न करीत होतो, मग लोकांना तरी काय सांगणार , जणू ते मृत्यूला घरी घेऊन जाण्यासाठीच बाहेर पडलेत व आपल्याच कुटुंबातील लोकांना असुरक्षित करत आहेत. हेच ते मोकाट लोक आताच्या या निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असे मला तरी वाटते,आपल्याच कुटुंबातील लोकांचा जीव धोक्यात घालण्यासाठी हेच जबाबदार नाहीत का? यांना काळ क्षमा करणार नाही.. कोण समजवणार यांना, कधी सुधारणार ही लोकं... यांनी आपल्या आप्तस्वकियांचा मृत्यू पाहिला नाही,मग त्याची वाट पहातायत का? आम्हीही माणसेच आहोत ,अंत्यविधीचा हा रोजचा तांडव पुन्हा पाहण्याची आमची हिंमत नाही, आता हे जनताच ठरवेल कसं जगायचं?


    मित्रांनो ,गांभीर्य ओळखा ,वेळ आणखी गेलेली नाही.. सावध व्हा आपण आहोत तर जग आहे.आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब , परिवार याचा विचार करा. दिवस वाईट आहेत पण सुरक्षित राहिलात तर पुन्हा नव्याने सगळे सुरू करता येईल ...नाहीतर ... बाकी तुमची इच्छा ! 


              तुमचा हितचिंतक व सेवक


                         भारत राठोड ,


                           मुख्याधिकारी ,


                            नगर परिषद


                              उदगीर


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image