उदगीरच्या कोविड रुग्णालयात रुग्णांचे हाल: सर्वपक्षीय नगरसेवकांनी घातला डॉक्टरांना घेराव : त्वरित परिस्थितीत सुधारणा करा: नगराध्यक्ष बागबंदे


उदगीर: येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप करून उदगीर नगर परिषदेचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी डॉक्टरांना घेराव घालत याबाबत जाब विचारला. शिवाय रुग्णालयातील परिस्थिती त्वरित सुधारणा करून घ्या नाहीतर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा नगराध्यक्ष बागबंदे यांच्यासह नगरसेवकांनी दिला. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात येत आहेत. येथील कोविड रुग्णालयात उदगीर, अहमदपूर जलकोटसह नांदेड जिल्हा व कर्नाटकातील सीमा भागातील रुग्ण येत आहेत. दिवसेंदिवस या रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसात मृत्यूचीही संख्या वाढत आहे. या रुग्णालयात शोचालय व बाथरूमची असलेली दुरावस्था गेल्या आठवड्यात माध्यमातून समोर आली. या रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांनी तेथे होत असलेल्या गैरसोयी बद्दल आपल्या नातेवाईकांना माहिती दिली. यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे सांगण्यात आले, जेवणाची वेळेवर सोय नसल्याचेही सांगण्यात आले. शिवाय कोविड रुग्णालयात वेळेवर डॉक्टरांची उपस्थिती नसल्याचीही तक्रार करण्यात आली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले व नगरसेवक यांच्या कानावर घातले. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले यांच्यासह नगर परिषदेतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी कोविड रुग्णालय गाठून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास व नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला. यावेळी सर्वांनीच रुग्णालयातील असुविधेबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. व डॉ. हरिदास व डॉ. देशपांडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. रुग्णालयातील परिस्थितीत त्वरित सुधारणा केली जावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी सर्वच नगरसेवकांनी दिला. यावेळी काँग्रेसचे गटनेते मंजुरखान पठाण, एमआयएम चे गटनेते शमशोद्दीन जरंगर, नगरसेवक मनोज पुदाले, फैजुखान पठाण, राजकुमार मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, रुपेंद्र चव्हाण, रामेश्वर पवार, फैयाज शेख, साबेर पटेल, नाना हाश्मी, यांच्यासह रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, भाजपाचे शहराध्यक्ष उदय ठाकूर, सनाउल्ला खान, आदी उपस्थित होते. दरम्यान नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांची भेट घेऊन रुग्णालयातील परिस्थिती संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. उपविभागीय अधिकारी मेगशेट्टी यांनी या शिष्टमंडळाशी बोलताना कोविड रुग्णालयात होत असलेल्या गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन दिले. कोविड रुग्णालयातील डॉक्टराशी चर्चा करून त्यांना सुधारणा करून घेण्यासाठी सूचना करू असे सांगितले. शिवाय कोविड रुग्णांचे मनोबल वाढले जावे यासाठी कोविड रुग्णालयात समुपदेशकाची नियुक्ती करणार असल्याचे ही यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज