डॉ.माधवी महाके यांच्या संशोधनामुळे उदगीरच्या प्राचीन इतिहासात पडणार मोलाची भर 

डॉ.माधवी महाके यांच्या संशोधनामुळे उदगीरच्या प्राचीन इतिहासात पडणार मोलाची भर 
उदगीर : एखाद्या  ठिकाणाचा इतिहास समजण्यासाठी पुरातत्त्वीय साधने अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात.  ऐतिहासिक स्थापत्य  हेही पुरातत्त्वीय साधन असून उदगीर परिसरात लेणी ,मंदिरे , किल्ला, विहिरी, बारवा असे विविध प्रकारचे स्थापत्य आढळून येते. यात अत्यंत मोलाची भर  नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार पडली असून, उदगीर परिसरात सात एकाश्मक मंदिरे आढळली आहेत.
    एकाश्मक मंदिर म्हणजे एका पाषाणात निर्माण केलेले मंदिर होय. अशी मंदिरे दक्षिण भारतात मोठया प्रमाणात आढळतात. प्रा.डॉ. माधवी महाके या मंदिरावर अधिक  संशोधन  करत आहेत. त्यांनी अनेक इतिहास संशोधक तज्ञांची मते घेतली असून त्या आधारे ती मंदिरे  एकाश्मक मंदिरे असल्याचे सिद्ध केले आहे . मंदिर स्थापत्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. प्रभाकर देव, डॉ. अनिल कठारे  , डॉ. सोमवंशी एस. आर., डॉ. शिंदे ए.डी., योगेश प्रभुदेसाई आदी स्थापत्य अभ्यासकांनी ही एकाश्मक मंदिरे असून विशेष उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे . अंबरनाथ मंदिराच्या जेष्ठ संशोधक डॉ. कुमुद कानिटकर यांच्या मते, ही मंदिरे एकाश्मक आहेत मात्र वेरूळ मंदिराशी याची तुलना होवू शकत नाही असे सांगितले. याशिवाय या मंदिराचा उद्देश हा ध्यानधारणा, एकांत  या उद्देशासाठी झालेला असला पाहिजे असे मत डॉ. कानिटकर यांनी नोंदवले. मूर्तीशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रदीप म्हैसेकर यांनीही या मंदिराच्या निर्मितीचा उद्देश एकांत साधना असल्याचे मत व्यक्त केले आहे.
     उदगीर पासून बारा किमी अंतरावर लोहारा गावाच्या हद्दीत उत्तरेस गैबी साहेब दर्ग्यानजीक  आणि अलीकडेच नव्याने शोधलेल्या लोहारा लेणीलगत , लोहारा बेटावरच ही एकाश्मक मंदिरे आहेत. या मंदिरापैकी एका मंदिरात भग्न शिवलिंग ही आहे, अशी  माहिती डॉ. महाके यांनी दिली. महाराष्ट्रात अशी मंदिरे विदर्भ , कोल्हापुर जिल्ह्यात पळसंबे येथे आहेत. महाराष्ट्रातील अशा सर्व  एकाश्मक मंदिराचे संशोधन करणाऱ्या श्री. अनिल दुधाने यांनी लोहारा बेटावरील मंदिरास विशेष वैशिष्ट्यपूर्ण म्हटले आहे. शिलाखंड कोरुन ही मंदिरे निर्माण केली आहेत. प्रत्येक मंदिर एका स्वतंत्र पाषाणात आहे. या मंदिरास द्वारशाखा आहेत. एका मंदिरातील पूजनीय देवताही लक्षात येते. उदगीर परिसरातील पाषाण हा अशा स्थापत्यासाठी अनुकूल नसताना लेणी ,मंदिरे निर्माण करण्याच्या भूमिकेवरुन या परिसराचे प्राचीन महत्व अधोरेखीत होते .
      या मंदिराच्या निर्मितीसाठी सुमारे चार मीटर पासून सहा मीटर उंची पर्यन्त पाषाण वापरले आहेत. प्रत्येक मंदिरास द्वार आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारे ही मंदिरे केवळ उदगीर नव्हे तर मराठवाडयाच्या इतिहासात मोलाची भर टाकणारी आहेत कारण अन्यत्र मराठवाड्यात असे स्थापत्य असल्याची  नोंद अद्याप  नाही. मंदिराची सुरवातीच्या अवस्था दर्शवणाऱ्या या एकाश्मक मंदिराच्या कालखंड निश्चीतीबाबत तज्ञांशी चर्चा करत असल्याची माहिती  डॉ. महाके यांनी दिली आहे. 
     उदगीरचा प्राचीन इतिहास या स्थापत्यामुळे उलगडला असला तरी हे ठिकाण अत्यंत दुर्गम असून  या मंदिराचे व लेणीचे जतन ,संवर्धन होणे आवश्यक आहे, अन्यथा हा वारसा नष्ट होवू शकतो, असे मत  म. ए. सोसायटीचे सचिव आणि जेष्ठ इतिहास अभ्यासक माजी आमदार प्रा.मनोहर पटवारी यांनी व्यक्त केले.
    या संशोधनामुळे भविष्यात केवळ लोहारा , उदगीर नव्हे तर मराठवाड्यातील कला, स्थापत्याच्या इतिहासास नवे वळण मिळेल, असे मत डॉ. माधवी महाके यांनी व्यक्त केले.


Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image