प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, :- जिल्हृयामध्ये यावर्षी आज अखेर सरासरीच्या 105% पाऊस पडलेला असून काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सुध्दा झालेली आहे. तसेच मागील 10 दिवसापासुन सतत पाऊस होत असून यामूळेही काही ठिकाणी पुर/क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान होत आहे. यानुषंगाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे उपरोक्त नमूद कारणाने नुकसान झालेले आहे असा कोणताही शेतकरी पंचनाम्यामधून सूटणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत तालुका कृषि अधिकारी व विमा कंपनीस सूचना दिलेल्या आहेत. यासोबतच जिल्हयामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तीक शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने पिक नुकसान पूर्वसुचना देण्याकरीता सुचिधा उपलब्ध् आहे.
पिक विमा योजनेमध्ये शेतात पाणी थांबून राहील्यामुळे झालेले नुकसान व पूराचे पाणी शेतात घूसल्याने झालेले नुकसान या दोन बाबींमुळे झालेले नुकसानी संदर्भात भरपाई मिळू शकते.ज्या शेतकऱ्यांचे वरील कारणाने नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.ऑफलाईन अर्जासाठी प्रत्येक तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये विमा कंपनीचा प्रतिनिधी उपलब्ध् आहे. या संबंधाने शेतकरी या प्रतिनिधीकडे अर्ज करु शकतात.अर्जासोबत पिक विमा भरल्याची पावती व 7/12 उतारा कागदपत्र सादर करावीत.
शेतकरी ऑफलाईन अर्ज बँक/ महसूल विभाग /कृषि विभाग यांच्याकडेही करु शकतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Crop Insurance मोबाईल ॲपचा वापर करुन नुकसानीची सूचना देता येईल. ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत ऑफलाईन /ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकरी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा