अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे: कृषिमंत्री दादाजी भुसे

अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या


पाठीशी शासन खंबीरपणे उभे: कृषिमंत्री दादाजी भुसे


लातूर/उस्मानाबाद, :- राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकामध्ये पाणी साचले जाऊन सोयाबीन, तूर ,कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच काही पिकांना जागेवरच कोंबे आलेली आहेत. तरी प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे पंचनामे त्वरित करून प्रस्ताव सादर करावेत. राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.


लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर व उस्मानाबाद या दोन्हीही जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा व कृषिविषयक योजनांच्या आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.


कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घ्याव्यात. या सर्व माहितीचे संकलन करून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने पाहणी करावी याबाबत केंद्राकडे मागणी केली जाणार आहे. राज्य शासन ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.


पी एम किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. महसूल व कृषी विभागाने यासाठी एक संयुक्त मोहीम राबवावी व या मोहिमेच्या माध्यमातून या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी देऊन लातूर जिल्ह्यातील तीन लाख 17 हजार शेतकऱ्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही देशातील एकमेव अशी योजना आहे की अत्यंत कमी कालावधीत व कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही राज्यातील जवळपास 30 लाख 50 हजार शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून 19 हजार 500 कोटी चा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना बँकाकडून पुनर्वित्त पुरवठा झालेला आहे का नाही याबाबतची माहिती प्रशासनाने घ्यावी व त्या प्रत्येक शेतकऱ्याला पुनर्वित्त पुरवठा मिळवून द्यावा असेही त्यांनी सूचित केले.


खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे याबाबत कृषि विभागाने प्रबोधन करावे. माननीय मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे, त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे व ग्राहकांनाही शेतकऱ्यांचा थेट माल पोहोच केला जाणार असल्याची माहिती श्री. भुसे यांनी दिली.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत मराठवाडा व विदर्भाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना सक्षम केले जाणार आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार आहे, त्यामुळे प्रशासन व कृषी विभाग यांनी खते व बियाण्याच्या तयारीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश श्री भुसे यांनी दिले.


बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे, वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन करण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगून बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. तसेच बँकाकडून पीक कर्जाच्या वेळेस शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे, त्याबाबत बँकांनी योग्य ती दक्षता घेऊन सर्व शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक द्यावी अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. व यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी निर्देशीत केले.


लातूर जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित सुरू करण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार घाडगे पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे, पीक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शेततळे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणे आदी मागण्या करून त्याबाबत सकारात्मक विचार करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी असे आवाहन केले.


प्रारंभी लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गवसाने यांनी लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेला असून 60 पैकी 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे व एकूण 99 हजार 551 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. उस्मानाबाद चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या 103 टक्के पाऊस झालेला असून 21 मंडळात शंभर टक्के पाऊस झालेला असून सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर 41 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.


*वांजरवाडा ता. जळकोट येथील पीक नुकसानीची पाहणी*


कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेती पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. या भागातील सोयाबीनच्या पिकात पावसाचे पाणी साचल्याने पिके पिवळी पडली असून सोयाबीनच्या शेंगांना कोंबे आल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याबरोबरच कृषि सह संचालक श्री. जगताप व उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. तीर्थकर उपस्थित होते.


Popular posts
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image