राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे वेळेतच पूर्ण करावीत -राज्यमंत्री संजय बनसोडे

राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे वेळेतच पूर्ण करावीत


-राज्यमंत्री संजय बनसोडे


*आष्टा मोड ते तिवटघ्याळ रस्ता एका वर्षात पूर्ण करावा


* महामार्ग रस्त्यावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे


 


लातूर - जिल्हयात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे चालू आहेत. संबंधित अधिकारी वर्गाने सुक्ष्म नियोजन करुन कामे वेळेतच पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन,सांसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.


येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद विभागाअंतर्गत लातूर जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या चालू असलेल्या कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एम.एस.आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, उपअभियंता अशोक इंगळे,टिम लिडर आर.एस.शिंदे, संचालक केसीसीपीएल गजानन पोकलवार, दिपक गोयल, कल्याण पाटील उपस्थित होते.


यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, जिल्हयात राष्ट्रीय महामार्गाचे कामे चालू आहेत.संबंधित अधिकारी वर्गाने सुक्ष्म नियोजन करुन तसेच वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे वेळेतच पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना दिल्या. ही कामे वेळेवर न झाल्यास संबंधित गुत्तेदारावार योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. आष्टा मोड ते तिवटघ्याळ रस्त्याचे काम चालू आहे. हे काम एक वर्षाच्या आत पूर्ण होईल याची अधिकारी वर्गाने दक्षता घेऊन हा मॉडेल रस्ता तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.


राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम करीत असताना संबंधितांनी कामाचा चांगला दर्जा ठेवून सदरील रस्त्यावर वृक्ष लागवडीचे नियोजन करुन वृक्ष लागवड करावी. व याचा वेगळा पॅटर्न निर्माण करा असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सूचित केले.बैठकीच्या प्रारंभी एम.एस.आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी प्रास्ताविक करुन रस्त्याच्या कामाची माहिती दिली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.