* मराठा आरक्षण मागणी पूर्णत्वाकडे:* *खा.भगवंत खुबा*
*मुख्यमंत्री येडियुरप्पांचे ठोस आश्वासन*
औराद बा. (प्रतिनिधी):- कर्नाटक राज्यात मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन बिदरचे खासदार भगवंत खुबा यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा दिले. यावेळी सदरील मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे खा. खुबा यांनी सांगितले.
कर्नाटकातील अल्पसंख्याक असलेला मराठा समाज हा ३-B श्रेणी जाती संवर्गात आहे. या समाजाकडून अनेक वर्षांपासून ३-B मधून काढून २-A मधील जाती संवर्गात मराठा समाजाचा समावेश करावा अशी मागणी होत होती. तत्कालीन कर्नाटक मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असलेले एन. शंकरप्पा यांनी मराठा समाजाची मागणी योग्य असून ३१ डिसेंबर २०१२ रोजी २-A श्रेणी जाती संवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्याची शासनाकडे शिफारस केली होती. मात्र कर्नाटक शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी २०१६ मधील एक मराठा लाख मराठा या जनांदोलनाने रौद्र रुप धारण केल्याचे लक्षात येताच २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अखेर भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा यांनी सत्ता येताच तात्काळ मराठा आरक्षण मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र बहुमता अभावी हे आश्वासन मागे पडले. अखेर भाजपाने बहुमताचा जादुई आकडा गाठून २०१९ मध्ये सरकार बनवले व बी.एस. येडीयुरप्पा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मराठा संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांची वेळोवेळी भेट घेऊन आश्वसनाची आठवण करून दिली. बिदर जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाची घोर निराशा होणार नाही याची दक्षता घेत खासदार भगवंत खुबा यांनी गुरुवारी (आक्टोंबर १) रोजी मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मंजूर संबंधित मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांना निवेदन दिले असता दिलेल्या निवेदनावर मूख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी लवकरच ही मागणी पूर्णत्वाकडे जात असल्याचे सांगून ही माहिती तातडीने मराठा समाजाला कळवण्याची सूचना खा. भगवंत खुबा यांना केली आहे.याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री गोविंद करजोळ यांचीही उपस्थिती होती.