प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्मय पुरस्कार जाहीर



डॉ. विलास खोले, रमेश रावळकर, उषा हिंगोणेकर, डॉ. प्रतिभा जाधव, एकनाथ आव्हाड, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, योगिनी सातारकर आणि मोतीराम राठोड हे पुरस्कारांचे मानकरी

नांदेड दि. 21 -

येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या 2020-21 ह्या वर्षीच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले, रमेश रावळकर, उषा हिंगोणेकर, डॉ. प्रतिभा जाधव, एकनाथ आव्हाड, ऊर्मिला चाकूरकर, योगिनी सातारकर आणि मोतीराम राठोड यांचा ह्या पुरस्कारांच्या मानकर्‍यांमध्ये समावेश आहे.

(1) साहित्य व संशोधन ह्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देणार्‍या एका ज्येष्ठ साहित्यिकाला दरवर्षी मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी पुणे येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. विलास खोले यांची निवड करण्यात आली आहे. रु. 11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या  पुरस्काराचे स्वरूप आहे.

(2) मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणार्‍या प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारासाठी औरंगाबाद येथील साहित्यिक रमेश रावळकर लिखित राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’टिश्यू पेपर’ ह्या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. रु. 11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या प्रशांत पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ’धगधगते तळघर’ ह्या कवितासंग्रहाची तसेच लासलगाव येथील लेखिका प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’अस्वस्थतेची डायरी’ ह्या लेखसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु. 5000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यंदापासून बालसाहित्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच पुरस्कारासाठी मुंबई येथील बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ’शब्दांची नवलाई’ ह्या बालकवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रु. 3500 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील तीन साहित्यिकांना देण्यात येणार आहे.

1) डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांनी लिहिलेल्या आणि पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’सिंदबादच्या विमानातून’ ह्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

2) डॉ. योगिनी सातारकर-पांडे यांच्या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ’शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ ह्या कवितासंग्रहाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

3) मोतीराम रूपसिंग राठोड यांनी लिहिलेल्या आणि संगत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’आठवणींचं गाठोडं’ ह्या आत्मकथनाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रत्येकी रु. 2500 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. भु. द. वाडीकर आणि प्रो. डॉ. मथु सावंत यांच्या परीक्षण समितीने ह्या पुरस्कारांची निवड केली. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी नांदेड येथे ह्या पुरस्कारांची घोषणा केली. प्रतिष्ठानच्या वाङ्मय पुरस्कारांचे हे 21वे वर्ष आहे.

दरवर्षी अतिशय दिमाखदार समारंभात ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते, पण यंदा कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार घरपोच पाठविण्यात येणार आहेत, असे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.



Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही