केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात
उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
उदगीर : उदगीर परिसरातील शेतकऱ्यांची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय दूध योजनेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे सोमवारी दि. 29 जानेवारी रोजी येत असून हा प्रकल्प लवकरच पुनरुज्जीवीत करण्याच्या दृष्टीने योग्य त्या हालचाली होणार असल्याची माहिती खा. सुधाकर शृंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उदगीर येथील शासकीय दूध योजना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे. त्यामुळे ही योजना चालविण्यासाठी राज्य सरकारने असमर्थता दर्शविली होती. राज्य शासनाकडून हा प्रकल्प चालू करण्यासाठी असमर्थता दर्शविल्यानंतर उदगीर येथील काही तरुणांनी ही योजना उदगीर व परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाची योजना असल्याने ही योजना खाजगी कंपनीला चालविण्यासाठी न देता केंद्र शासनाच्या एन.डी. बी.टी. या संस्थेमार्फत चालविण्यात यावी अशी मागणी आपल्याकडे केली होती अशी माहिती खा. शृंगारे यांनी दिली. ही शासकीय दूध योजना एन.डी. बी.टी. मार्फत चालविण्यासाठी आपण केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत पाठपुरावा केला. राज्यशासनाकडून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यासाठी आपण प्रयत्न केले. आता ही योजना लवकरच सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे दूध डेअरीची पाहणी करण्यासाठी दि. 29 जानेवारी रोजी येणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती देऊन खासदार शृंगारे यांनी उदगीरचा हा दूध भुकटी प्रकल्प चालू होण्यासाठी लागेल तेवढा निधी आपण केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपा लोकसभा प्रमुख राहुल केंद्रे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले, दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाचे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य मोतीलाल डोईजोडे, संतोष कुलकर्णी, ऍड. दत्ताजी पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा