*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

 *महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद*


▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन


▪️महाराष्ट्रातील लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे घडले दर्शन


▪️अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती


उदगीर


: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात उदगीर येथे येथे झालेल्या 'मराठी बाणा' कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा भव्य सेट उभारण्यात आला होता. तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या सैराट चित्रपटातील संवादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. 


जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, अभिनेत्री रिंकू राजगुरू, ना. संजय बनसोडे यांच्या पत्नी श्रीमती शिल्पाताई संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, ऍड. गुलाब पटवारी, ऍड. व्यंकट बेंद्रे, तहसीलदार राम बोरगावकर 'मराठी बाणा'चे अशोक हांडे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.


महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या 'मराठी बाणा' या कार्यक्रमात प्रारंभी 'उठी उठी गोपाला' हे भक्तीगीत सादर करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात सकाळच्या प्रहरी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग आणि गाव जागवित येणाऱ्या वासुदेवाच्या स्वारीचे दर्शन कार्यक्रमात घडले. सोबतच विठ्ठल रुक्मिणीच्या नामाचा गजर करीत निघालेली दिंडी या कार्यक्रमात अवतरली. यावेळी टाळ-मृदुंगाच्या तालावर रसिकही तल्लीन होवून गेले. 'भलकरी दादा भलं रं...' ची साद घालत शेतकऱ्याच्या शिवाराचं दर्शन घडविणारे गीत यावेळी सादर झाले. त्यानंतर 'सुंबरान मांडलं गा...' हे लोकगीत सादर झाले. या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.


आदिवासी ठाकर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे 'आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं...' आणि 'लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला..' या गीतावरील आदिवासी नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. 'माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...' आणि ' शेत बघा आलंय राखणीला...' ही शेतकरी गीते यावेळी सादर झाली.


'कानडा राजा पंढरीचा' हा अभंग, 'तिरपी नजर माझ्यावरी या सावळ्या हरीची...' ही गवळण, संत परपंपरेत समाजाचं प्रबोधनाचं प्रभावी साधन ठरलेले भारुडही यावेळी सादर झाले.


'मराठी पाऊल पडते पुढे...' या गीताला अभिनयाची जोड देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य लढ्याचे दर्शन घडवत मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची महानता या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली. यानिमित्ताने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.


पारंपरिक विवाह सोहळा, नवविवाहितेची पहिली मंगळागौर, लावणी, कोळीगीत, गोंधळ यासह विविध लोककलांचे आणि लोकगीतांचा ठेवा यावेळी प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आला. त्याला उदगीरकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलाकारांनी आपल्या कलेचा अविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.


*महासंस्कृती महोत्सवातून उदगीरकरांसाठी सांस्कृतीक मेजवानी :  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*


उदगीर तालुक्यात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासोबतच येथील नागरीकांसाठी साहित्य, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा महोत्सव आणि क्रीडा स्पर्धांचे यापूर्वी आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी बाणा' हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव अंतर्गत हा कार्यक्रम होत असून उदगीर तालुक्यातील रसिकांसाठी यामुळे सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.


*समृध्द सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी : जिल्हाधिकारी*

महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा 'मराठी बाणा' कार्यक्रम ऐतिहासिक उदगीर शहरात होत आहे. य कार्यक्रमामुळे आपला समृध्द आणि वैभवशाली सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी मिळत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी सांगितले.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image