महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. उर्मिला चाकूरकर ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम: महिलांचा सन्मान

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. उर्मिला चाकूरकर

ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम: महिलांचा सन्मान



उदगीर : आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या काळात महिलांनी सर्वच क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. हे करीत असताना कुटुंब पातळीवरील आव्हानांनाही त्यांना सामोरे जावे लागते. अशा धावपळीमुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन पैठण येथील प्रसिध्द साहित्यिका डॉ. उर्मिला चाकूरकर यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिका डॉ. उर्मिला चाकुरकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वूमन्स इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या उदगीर शाखेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा वैद्य होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक रमेश अंबरखाने, डॉ. रामप्रसाद लखोटीया, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. रमाकांत मध्वरे यांची उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. उर्मिला चाकूरकर म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलां शिक्षण घेऊ लागले हे महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आज महिलांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. असे सांगून हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत महिलांनी मोलाचे योगदान दिले असल्याचे सांगितले. मागच्या पिढीतील आजीच्या गोष्टीतून बालकांवर मूल्यसंस्कार मिळत असत तसे संस्कार पुढील पिढीला मिळण्यासाठी या गोष्टीचे जतन होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक पुरुषांच्या यशात महिलेचा सहभाग असतो. मात्र केवळ महिला दिनानिमित्त कार्यक्रमातूनच महिलांचा सन्मान होतो, ही खेदाची बाब असल्याचे ही डॉ. चाकूरकर यावेळी म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. वर्षा वैद्य यांनी महिलांनी मानसिक आरोग्य जपले पाहिजे असे आवाहन करून खऱ्या अर्थाने कुटुंबव्यवस्था चांगली राहण्यासाठी पुरुष स्त्री समानता योग्य पद्धतीने असली पाहिजे असे सांगून आज माणुसकी लोप पावत चालली आहे अशी खंत व्यक्त केली. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीमती ललिता नागुरे, भगिरथीबाई मुडपे, सुमनताई गिरीधर पाटील, शारदा व्यंकटराव शिंदे, वर्षा सूर्यकांत भालके, यांचा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमात पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांच्या वतीने दिला रसिक प्रेम पुरस्कार डॉ. उर्मिला चाकूरकर व अश्विनी  निवर्गी यांना देण्यात आला.

प्रास्ताविक प्रा. रमाकांत मध्वरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दीपक बलसुरकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रेमलता नळगिरे व मुरलीधर जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीराम चामले यांनी केले.

कार्यक्रमासाठी विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, व्ही. एस. कुलकर्णी, अनिल पत्तेवार, चंद्रकला बिरादार, सुनंदा सरदार,धनराज बिरादार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.