' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....

 ' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....



उदगीर ( विक्रम हलकीकर) देशाच्या राष्ट्रपतींचा ताफा एक सभा आटोपून परत जात असताना वाटेतच राष्ट्रपती गाडीतुन खाली उतरतात काय अन धांदल सुरू होते सुरक्षा रक्षकांची... गाडीतून उतरलेल्या राष्ट्रपती रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांशी संवाद साधतात, चिमुकल्या मुलींशी बोलतात काय ? हे सारेच वातावरण पाहून सामान्य महिला गहिवरुन जातात.

हा प्रसंग उदगीर येथे बुधवारी घडला. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या पुढाकारतुन राज्य शासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या बौद्ध विहारच्या उद्घाटनासाठी बुधवार दि. 04 सप्टेंबर रोजी उदगीरला आल्या होत्या. बौद्ध विहार चे उद्घाटन झाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व महिलांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिला सक्षमीकरण झाले पाहिजे यावर भर देऊन महिलांच्या सक्षमीकरनासाठी राज्य व केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचे कौतुक केले. या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधून त्या उदगीर येथील शासकीय विश्रामग्रहाकडे मोटारीने जात होत्या. गाड्यांचा ताफा थोडा पुढे जाताच राष्ट्रपती महोदयांची गाडी अचानक रस्त्यावर थांबली आणि राष्ट्रपती गाडीतून खाली उतरून चालू लागल्या. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या महिलांशी हस्तांदोलन करून त्यांनी अनेक महिलांशी यावेळी संवाद साधला. रस्त्यावर एक लहान मुलगी थांबलेली होती. राष्ट्रपती महोदयांनी त्या मुलीजवळ जाऊन तिची आपुलकीने विचारपूस केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या अचानकपणे रस्त्यावर उतरून चालू लागल्याने सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली. मात्र प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपती रस्त्यावर उतरून चालत निघाल्याने उदगीरकरांना त्याचे मोठे कुतूहल वाटले. 

देशाचे राष्ट्रपती उदगीर शहरात पहिल्यांदाच आल्या असून त्यांचा हा दौरा अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरला आहे.